प्रदीर्घ संघर्षांनंतर २३ जिल्हे, साडेआठ कोटी लोकसंख्या आणि २ लाख ७५ हजार चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्र असलेल्या आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती दृष्टिपथात असताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने आंदोलनाचा पांचजन्य वाजविणारे कथित विदर्भवादी नेते रणांगणाचे कुरुक्षेत्र सोडून कुठे दडले आहेत, यावर आता मंथन सुरू झाले आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गतच शीतयुध्द सुरू असले तरी येत्या बुधवारी यासंदर्भातील महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे. संसदेच्या ६ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात तेलंगणाच्या राज्याच्या निर्मितीबाबतचे विधेयक सादर होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तेलंगणाची निर्मिती आता काळया दगडावरची रेष वाटू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची चळवळ करणारे नेते कुठे आहेत, असा सामान्यांचा प्रश्न आहे.
विदर्भवीर म्हणून ख्याती असलेल्या जांबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भासाठी फॉरवर्ड ब्लॉक पक्षात प्रवेश करून स्वगृही परतल्याची घोषणा केली आहे. फॉरवर्ड ब्लॉकमधून काँग्रेसमध्ये, काँग्रेसमधून शिवसेनेत, शिवसेनेतून स्वत स्थापन केलेल्या विदर्भ काँग्रेसमध्ये आणि पुन्हा फॉरवर्ड ब्लॉक असे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण ‘आता उरलो फक्त स्वतंत्र विदर्भासाठी’ अशी घोषणाही धोटे यांनी नुकतीच केली आहे. धोटे यांचे ७७ वर्षांचे वय लक्षात घेता त्यांनी पूर्वीसारखी प्रचंड आंदोलने उभारण्याची अपेक्षा करणे गरवाजवी असली तरी स्वतंत्र विदर्भासाठी शिवसेना वगळता सर्व पक्षांची बांधल्या गेलेली मोट सल होत असतांना धोटे यांचे हतबल होणे अनेकांना क्लेषदायी होत आहे. धोटे यांचे एकेकाळचे कट्टर सहकारी माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार, माजी मंत्री सुरेंद्र भूयार यांच्यापासून तर फॉरवर्ड ब्लॉकचे राज्य सरचिटणीस देवीदास भोरे, यांच्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइंचे सारे गट, भाजपचे सारे नेते एक तर चुप्पी साधून आहेत किंवा ‘झालाच पाहिजे’च्या मागणीचे कागदी घोडे नाचवत आहेत.
ज्या जोमाने आणि ताकदीने आंध्रमध्ये स्वतंत्र तेलंगणाची मागणी रेटण्यात आली, अभूतपूर्व ‘बंद’ची आंदोलने झाली. खासदार, आमदार, आणि मंत्र्यानी राजीनामे फेकले. तेवढया ताकदीने विदर्भात कुणीही तेवढय़ा तीव्रतेने लढा दिला नाही. ब्रिजलाल बियाणी, लोकनायक बापूजी अणे, माजी मंत्री टी.जी. देशमुख, उत्तमराव पाटील या दिवंगत नेत्यांसह जांबुवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे, विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नानाभाऊ एंबडवार, सुरेंद्र भुयार, नितीन गडकरी, अशा असंख्य नेत्यांनी सत्तेची फळे चाखली पण स्वतंत्र विदर्भासाठी सत्तेचा लोभ सोडून राजीनामा देण्याची तयारी कधीच दाखवली नाही. केवळ उपद्रव मूल्यांच्या भयामुळे जनतेने विदर्भाच्या मागणीसाठी ‘बंद’च्या आवाहनाला ८०-८५ टक्के प्रतिसाद दिला असेल तरी तो हृदयाच्या गाभाऱ्यातून किती होता, हाही एक प्रश्न यानिमित्ताने चव्हाटय़ावर आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ अशी सलग सव्वा अकरा वर्षे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विदर्भाची चळवळ फोफावणार नाही, याचीच काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावली. दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने विदर्भाला तीनदा मुख्यमंत्रीपद मिळाले पण विदर्भाचा ना विकास झाला ना विदर्भ स्वतंत्र झाला, ना या नेत्यांना कोणी या संदर्भात जाब विचारला. दृढ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, सत्तेसाठी लांगुनचालन करण्याची प्रवृत्ती, निस्वार्थ-त्यागी भावनेची उणीव, विदर्भाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेशी घरोबा आणि दुसरीकडे स्वतंत्र विदर्भाचा बिगुल हा भाजपचा राजकीय दुटप्पीपणा हा राजकीय पक्षांच्या बाबतीत जनतेचा अनुभव असल्याने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला कॉग्रेसचे केंद्रीय नेतृत्व भीक घालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा