किरकोळ कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची, तर इतर चौघांना ४ वष्रे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
माहूर तालुक्यातील िहगणी येथील कैलास संभाजी सुरोसे याचा गावातीलच मधुकर धर्मा राठोड (वय २७) याच्याशी जि. प. निवडणुकीदरम्यान वाद झाला. सन २००८ मध्ये झालेल्या या वादानंतर दोघांमध्ये वितुष्ट होते. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून १९ ऑगस्ट २००९ रोजी कैलास हा त्याचा मित्र सुभाष राठोड याच्यासोबत फुलसांगवीहून गावी परतत होता. िहगणीत येताच राठोड व त्याच्यासोबत असलेल्या सहाजणांनी कैलासला (वय ३२) अडवले. तू माझ्याशी वैर करतोस काय, असे म्हणत राठोड, कैलास राठोड (२०), धर्मा राठोड (६५), विजय राठोड (२२), सुदाम राठोड (३०), किशन राठोड (५४) व गजानन राठोड (२०) यांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. काठी, कुऱ्हाडी व लोखंडी सळईने केलेल्या हल्ल्यात कैलास सुरोसे रक्तबंबाळ झाला. या वेळी आरडाओरडा ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली. हल्लेखोर पसार झाले. जखमी कैलास व त्याचा मित्र सुभाष राठोड या दोघांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच कैलास मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. माहूर पोलिसांनी या प्रकरणी सातजणांवर खुनाच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू मोहन जाधव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयाने या प्रकरणी १२ जणांच्या साक्षी नोंदवल्या. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व उपलब्ध पुराव्याआधारे न्या. एम. के. महाजन यांनी मधुकर, कैलास व धर्मा राठोड या तिघांना जन्मठेप, प्रत्येकी हजार रुपये दंडाची, तर विजय, सुदाम, किशन व गजानन राठोड या चौघांना चार वष्रे सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू अॅड. डी. जे. िशदे यांनी मांडली.

Story img Loader