ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदाचे सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नासिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील हा सातवा लेख.

गावातील वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत स्थानिक पातळीवर एक व्यवस्था निर्माण झाली आहे. हे तंटे सोडविण्याची भिस्त असलेल्या तंटामुक्त गाव समितीला अभ्यास करून विविध सोपस्कार पार पाडावे लागतात. मोहिमेंतर्गत कोणकोणते तंटे मिटवता येऊ शकता याचाही अभ्यास सदस्यांना करावा लागतो.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या गावांची यादी दरवर्षी १ सप्टेंबर रोजी तालुका पातळीवरून जाहीर झाल्यानंतर तंटामुक्त गाव समित्यांमार्फत सामोपचाराने तंटा मिटविण्याचे काम सुरू होते. समितीला या काळात अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मोहिमेंतर्गत दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर असे कोणकोणते तंटे मिटविता येऊ शकतात, याचाही अभ्यास सदस्यांना करणे क्रमप्राप्त ठरते. त्यासाठी गावात तंटे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, अस्तित्वातील व निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविणे, असे या मोहिमेचे स्वरूप आहे.
त्या अंतर्गत चार प्रकारांतील तंटे ग्रामपंचायत पातळीवर मिटविण्यासाठी विचारात घेता येतात. गाव पातळीवरील वाद हे प्रामुख्याने दिवाणी व महसुली स्वरूपाचे असतात. या वादाचे रूपांतर अनेकदा फौजदारी वादाच्याही स्वरूपात होते. तंटामुक्त गाव समितीला स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, वारसा हक्क, वाटप, हस्तांतरण आदी, तसेच भाडेपट्टा, जंगम मालमत्तेची खरेदी-विक्री, हस्तांतरण, गहाण व कर्ज व्यवहार, रकमांची देवाणघेवाण, पोटगी व इतर कारणांवरून निर्माण झालेले सर्व दिवाणी तंटे सामोपचाराने मिटविता येतात. याशिवाय महसुली प्रकारातील शेतीचे मालकी हक्क, वारसा हक्क, हद्दी, अतिक्रमणे, वाटप त्याचप्रमाणे गावठाणातील जागा, गोठे यांचे मालकी हक्क, हद्दी आणि खुणा यांवरून निर्माण झालेले तंटे, कूळ कायदा, वतन कायदा, जमीनविषयक इतर विविध कायदे, सार्वजनिक रस्ता व शेतात जावयाचा रस्ता आदी कारणांवरून निर्माण झालेले तंटेही सोडविण्याची मुभा शासनाने दिली आहे.
शारीरिक, मालमत्ता आणि फसवणूक यासंबंधीचे अदखलपात्र आणि दखलपात्र फौजदारी गुन्ह्यांपैकी जे गुन्हे संबंधित पक्षकारांच्या सहमतीने व कायद्यानुसार मिटविता येऊ शकतात, असे फौजदारी स्वरूपाचे तंटे वा गुन्हे यांच्याबरोबर सहकार, कामगार, औद्योगिक क्षेत्रातील व इतर तंटे मिटविण्यास मान्यता देण्यात आली आहे. जे फौजदारी तंटे कायद्यातील तरतुदीनुसार मिटविता येऊ शकणार नाहीत, अशा तंटय़ांबाबत संबंधित पोलीस ठाणे अथवा संबंधित न्यायालयांमध्ये योग्य ती कार्यवाही होत राहील.
सामोपचाराने तंटे सोडविण्याचा निकष आखताना ग्रामीण भागातील तंटय़ांचे स्वरूप लक्षात घेण्यात आले आहे. गावपातळीवर छोटय़ा-छोटय़ा कारणांवरून तंटय़ांची सुरुवात होते, मात्र वर्चस्व किंवा अस्तित्वाचा प्रश्न पुढे करत हेच तंटे अनेकदा मोठे स्वरूप धारण करतात आणि गावातील कायदा व सुव्यवस्थाही धोक्यात येते.
ग्रामीण भागात विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रथम शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे, यावर कटाक्ष ठेवण्यात आला आहे.

Story img Loader