डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या स्मारकासाठी दादरच्या इंदू मिलची १२.३० एकर जागा स्मारक समितीला हस्तांतरित करण्यात आल्याची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहात करण्यात आल्यानंतर रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करून या येत्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक तयार करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या निर्णयामुळे शहरात आज रिपब्लिकन नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत जल्लोश केला.
केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतानाचा इंदू मिलच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्मारक होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन निधीची तरतूद करावी. स्मारकासंदर्भात राज्य शासनाने रिपब्लिकन नेत्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करून स्मारकासंबंधी आराखडा तयार करावा अशी, अपेक्षा व्यक्त करून हा आंबेडकरी जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
रिपब्लिकन चळवळीतील नेत्यांनी आणि देशभरातील लाखो दलितांनी केलेल्या संघर्षांचा हा विजय आहे. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकला हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला सरकारने वेळ लावला असला तरी आता दलितांचा आणि समाजाच्या भावनांचा विचार करून सरकारने जागतिक पातळीवरील स्मारक उभे करण्यासाठी फार काळ प्रतिक्षा करायला लावू नये. २००३ पासून इंदू मिलच्या जागेसाठी संघर्ष सुरू असून या स्मारकामध्ये समुद्राला लागून डॉ. बाबासाहेब आंबेंडकरांचा भव्य पुतळा उभारावा. ज्या दिवशी हे जागतिक पातळीवरील स्मारक तयार होईल त्या दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन
 पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त
केली.
इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला हस्तांतरित करण्यासाठी सरकारने वेळ लावला असला तरी सर्वासाठी ही आनंदाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या एक दिवस सरकारने घोषणा करून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हा आंबेडकरी जनतेचा विजय असून या निर्णयाचे कोणत्याही रिपब्लिकन नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला मिळावी, यासाठी आंबेडकरी जनतेने केलेल्या संघर्षांचे हे फळ आहे. केंद्र आणि राज्य सरकारने उशिरा का होईना इंदू मिलची १२.३० एकर जागा देऊन दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जागा हस्तांतरित केल्यानंतर राज्य शासनाने त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्मारक तयार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. राज्य शासनाने मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. आंबेडकरी जनतेच्या बुलंद आवाज आणि संघर्षांतून ही जागा मिळाली असल्यामुळे या जागेबाबत किंवा स्मारकाचे श्रेय कुठल्याही नेत्यांचे नसून आंबेडकरी जनतेचे असल्याची प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केली. आंबेडकरी जनतेने केलेल्या तीव्र आंदोलनामुळे केंद्र आणि राज्य सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घ्यावा लागला. आजचा दिवस आंबेडकरी जनतेसाठी आनंदाचा असून त्यांच्या संघर्षांला मिळालेले हे यश आहे. जागा हस्तांतरित केल्यावर राज्य सरकारने फार काळ प्रतिक्षा न करता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक तयार करावे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे नेते भूपेश थुलकर यांनी व्यक्त केली.      

Story img Loader