दिग्दर्शक यश चोप्रांचा अखेरचा चित्रपट आणि तो प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून यशराज प्रॉडक्शन, शाहरूख आणि त्याच्या नायिकांसह सगळे कलाकार अजून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येतेय तसतसे यशजी असते तर काय केले असते, या विचारानेच प्रत्येक पाऊल उचलले जात आहे. ‘जब तक है जान’ प्रदर्शित होण्यापूर्वी आपल्या गावी जालंधरला जाण्याची यश चोप्रांची इच्छा होती. म्हणून आता त्यांचा चित्रपट तरी जालंधरमध्ये पोहोचेल, असे प्रयत्न सुरू असून शाहरूखने याकामी पुढाकार घेतला आहे. 
जालंधरमध्ये यश चोप्रांचे मूळ घर आहे. अनेक वर्षे त्यांनी या घरात व्यतीत केली आहेत. त्यामुळे त्या घराशी, गावाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. जालंधरशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी यश चोप्रांनी चित्रिकरणादरम्यान आपल्या कलाकारांना, तंत्रज्ञांना सांगितल्या होत्या. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एकदा तरी जालंधरला जाऊन यायची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. तेव्हा पूर्ण टीमनेच त्यांच्याबरोबर जालंधरला यायला मिळेल का, अशी विचारणा केली होती. आणि त्यांनीही टीमला हसत हसत परवानगी दिली होती. मात्र, त्यांच्या आकस्मित जाण्याने त्यांच्याबरोबर जालंधर पाहण्याचे टीमचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. तरीही त्यांची अखेरची इच्छा पूर्ण करायचीच, या निर्धाराने सगळ्या टीमने जालंधरला जाण्याची तयारी सुरू केली आहे.
या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह जालंधरमध्ये प्रमोशन करावे, यासाठी पुढाकार घेणाऱ्या शाहरूखने यशजींची अखेरची कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास जालंधर आणि दिल्लीत प्रमोशन करणार असल्याचे सांगितले. ‘प्रत्येक चित्रपटाची प्रमोशनची स्वत:ची एक पध्दत असते. ‘जब तक है जान’साठी भव्यदिव्य जाहिरातबाजी करून चालणार नाही कारण, यश चोप्रांची ही अभिजात प्रेमकथा आहे. फक्त तिचा संदर्भ आधुनिक काळातील आहे. त्यामुळे, या चित्रपटातला जो सहजभाव आहे त्याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहोत. शेवटी तो यशजींचा चित्रपट आहे आणि त्यांच्या चित्रपटाची ओळख प्रेक्षकांनाही आहे. ‘जब तक है जान’ हा संपूर्ण मनोरंजनात्मक चित्रपट असेल, असे शाहरूखने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा