भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्ह्य़ासाठी जम्बो कार्यकारिणीची घोषणा होताच या नव्या कार्यकारिणीविरोधात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली असून एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कल्याण, डोंबिवली परिसर हळूहळू भाजपच्या हातून निसटू लागला आहे, असे मत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केल्याने येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपच्या कल्याण जिल्ह्य़ातील ८३ सदस्यांच्या जम्बो कार्यकारिणीत आमदार, नगरसेवक, पदाधिकारी त्यांचे समर्थक तसेच, निष्क्रीय कार्यकर्त्यांचा भरणा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांच्या बेगमीचा विचार करून आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याची टीका भाजपच्या जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांंमार्फत केली जात आहे. भाजपची डोंबिवलीतील सध्याची वाटचाल, कार्यक्रम पाहता शहरात भाजप खिळखिळा होत चालला आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी केल्याने भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाची सूत्रे एका व्यक्तीच्या हाती एकवटू लागली असून असेच चित्र राहिल्यास भाजपच्या हातून डोंबिवली गेली समजा, असेही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मागील तीन वर्षांत भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या दबावामुळे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून भाजपची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्याची टिकाही सर्वत्र होऊ लागली आहे. सिताराम कदम, शैलेश धात्रक अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांना महत्वाची पदे नाकारण्यात आली आहेत. यापैकी धात्रक हे आमदारकीच्या शर्यतीत असल्याने त्यांना मूळ प्रवाहापासून दूर ठेवण्याचा त्यांच्या विरोधकांचा प्यत्नकाहीसा यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, यासंबंधी नरेंद्र पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सर्व मंडळ पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तरूण मंडळींना वाव देणारी कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे, असे सांगितले. काही मंडळी नाराज असली तरी त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी मात्र या निवड प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ मंडळींना या प्रक्रियेत विश्वासात घेण्यात आलेले नाही. या शहकाटशहाच्या राजकारणामुळे डोंबिवलीत भाजपला मोठा फटका बसण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी मंगेश गायकर, दिनेश तावडे असे निष्ठावान पक्ष सोडून गेली. तरी कोणाचे डोळे उघडत नाहीत. केवळ एका माणसासाठी सर्व संघटनाच वेठीस धरण्यात येत असेल तर ते सर्वथा चुकीचे आहे, असा टोलाही पाटील यांनी आमदार चव्हाण यांचे नाव न घेता हाणला.
जगन्नाथ पाटील-रवींद्र चव्हाण वाद शिगेला
भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्ह्य़ासाठी जम्बो कार्यकारिणीची घोषणा होताच या नव्या कार्यकारिणीविरोधात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली असून एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कल्याण, डोंबिवली परिसर हळूहळू भाजपच्या हातून निसटू लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-03-2013 at 12:31 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagannath patil ravindra chawhan debate on top