राज्य सरकारच्या ‘जागर जाणिवांचा’ अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्हय़ातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवगिरी महाविद्यालयास प्राप्त झाला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यातील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे बीज रुजविणे, विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व आत्मनिर्भरता विकसित होण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.
अभियानांतर्गत विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, तसेच लातूर जिल्हय़ातील महाराष्ट्र महाविद्यालय व जयक्रांती महाविद्यालय पुरस्कारास पात्र ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकर आदींच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण झाले. प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर व डॉ. कैलास ठोंबरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विवेकानंद महाविद्यालयाने पटकावला. विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, उपाध्यक्ष अमर शिसोदे, सहसचिव तुषार शिसोदे, प्रबंधक प्रभाकर मोरे यांनी ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असा पुरस्कार खासदार सुळे यांच्या हस्ते स्वीकारला. लातूरच्या निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र महाविद्यालयास एक लाख रुपयांचा पहिला, तर जयक्रांती महाविद्यालयाने ५० हजार रुपयांचा दुसरा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे, सौ. एरंडे, संयोजक प्रा. हंसराज भोसले, प्रा. एस. जी. कुलकर्णी, दिलीप धुमाळ, तर जयक्रांती महाविद्यालयातर्फे प्राचार्या कुसुम पवार, सचिव प्रा. गोविंद घार यांनी पुरस्कार स्वीकारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा