आठवडाभर गाजत असलेल्या गूळ सौद्याच्या प्रश्नाची कोंडी अखेर मंगळवारी फुटली. आजही पुन्हा दिवसभर गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत विक्रीसाठी येणारा गूळ रोखून धरला. यातून पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी सर्वसमावेशक बैठक होऊन त्यामध्ये व्यापाऱ्यांनी अधिकाधिक दर द्यावा,
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले आठवडाभर गूळ दरावरून संघर्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. गुळाला किमान ३२०० रूपयांचा दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गूळ उत्पादनाचा खर्च वाढला असल्याने त्याच्या विक्रीच्या दरातही वाढ झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. काल कांही शेतकऱ्यांनी सौदे करू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. तर कांहीनी सौदे सुरू करणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे आज मंगळवारी काय घडणार याकडे सर्वाचेच लक्ष वेधले होते.
गुळाचे सौदे करण्यास कांही शेतकऱ्यांचा विरोध होत असतांनाच आज सौद्यांना सुरूवात झाली. ३२००ते ३६०० रूपये दर मिळावा, अशी मागणी त्यांनी चालविली होती. दरावरून नापसंती व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी गुळाचे सौदे आज पुन्हा बंद पाडले. गूळ विक्रीसाठी आलेली वाहने थांबवून धरली. त्यामुळे मार्केट यार्डातील गुळाचा विक्री व्यवहार थंडावला.
या प्रश्नावर सायंकाळी सर्वसमावेशक बैठक झाली. सामाजिक कार्यकर्ते व गूळ व्यावसायिक पापा उर्फ महिपतराव बोंद्रे यांच्या पुढाकाराने बैठक झाली. बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाबासाहेब पाटील,फुलेवाडीत महात्मा फुले सोसायटीचे संचालक,व्यापारी, बाजार समितीचे संचालक यांनी या चर्चेत भाग घेतला. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये या भूमिकेतून व्यापाऱ्यांनी गुळाचे सौदे अधिकाधिक दराने करावेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सध्या असणारा गूळ विकला गेल्यानंतर दराचे अवलोकन करून तो निश्चित केला जावा, अशी सूचना करण्यात आली.गूळ व्यापाऱ्यांनी ती मान्य केल्याने आठवडाभर सुरू असलेला गूळ सौद्याचा वाद मंगळवारी सायंकाळी संपुष्टात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा