गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रवादी नगर शहर जिल्हाध्यक्षपदी माजी महापौर संग्राम जगताप यांची अखेर नियुक्ती करण्यात आली. या पदाचे आणखी एक दावेदार माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राहाता तालुकाध्यक्षपदावर तोडगा काढण्यात पक्षाला अपयश आले.
प्रदेशाध्यक्ष आ. मधुकर पिचड यांनी आज मुंबईत जगताप व घुले यांची नियुक्ती जाहीर केली. संग्राम यांच्या नियुक्तीचे पत्र आ. अरुण जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. गेल्या मे मध्ये पक्षाच्या नवीन संघटनात्मक नियुक्तया जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रचंड रस्सीखेच झाल्याने व त्यासाठी पक्षांतर्गत गटांनी निर्वाणीचे इशारे दिल्याने पक्ष नेतृत्वात हतबलता निर्माण झाली होती. त्यातूनच नियुक्ती सात महिने रखडली गेली. हा वाद थेट पक्षाध्यक्ष, केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्याकडे गेला होता.
शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी जगताप यांच्यासह शंकरराव घुले, त्यांचे बंधू व माजी नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, माजी शहर जिल्हाध्यक्ष अंबादास गारुडकर, हनिफ जरिवाला इच्छूक होते. नंतर जगताप यांच्या विरोधकांत एकी झाली व त्यांनी शंकरराव घुले यांचे नाव पुढे केले होते.
अखेर जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुपारी हे वृत्त शहरात येताच जगताप समर्थकांनी जल्लोष केला.
महापालिकेची निवडणूक वर्षांवर आल्याने त्याची तयारी प्रथम प्राधान्याने करुन राष्ट्रवादीची सत्ता मनपात स्थापन करणे यासाठी आपण प्रयत्न करू,असे संग्राम जगताप यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Story img Loader