बुधवारी दुपारी पिंजऱ्यातून सुटून धूम ठोकलेल्या बिबटय़ाला अखेर तब्बल वीस तासांच्या थरारनाटय़ानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा जेरबंद करण्यात आले आणि त्याला पकडण्यासाठी ‘रात्रीचा दिवस’ करणाऱ्या वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पकडलेल्या बिबटय़ाच्या मादीची रवानगी अभयारण्यात करण्यात येणार असल्याचे या विभागातून संध्याकाळी उशिरा सांगण्यात आले.
गंगापूर येथून पिंजऱ्यात जेरबंद केल्यावर आणलेल्या या बिबटय़ाला बुधवारी माकडाच्या पिंजऱ्यात ठेवले होते. मात्र, पिंजऱ्याचे गंजलेले गज वाकवून बिबटय़ाने लीलया बाहेर पडत वन विभागाच्या नाकावर टिच्चून धूम ठोकली. या प्रकारामुळे वन विभागाची अब्रू चव्हाटय़ावर आली. या प्रकाराने परिसरात एकच घबराट पसरली. या परिसरात वन विभागाचे बांबूचे बन आहे. तेथे आडोसा पाहून बिबटय़ा घुसला. तो शहराच्या परिसरात जाऊ नये, याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मोहिमेत प्राधान्य दिले. विशेष म्हणजे बिबटय़ाला पकडण्यासाठी आवश्यक साहित्यही वन विभागाकडे नव्हते. इंग्रजीत त्याला ‘ड्राट’ म्हटले जाते. झायलासीन आणि किटामायसीन या गुंगीच्या औषधांची मात्रा त्यात असते.
बांबूच्या वनात घुसलेल्या बिबटय़ाला शोधण्यासाठी रात्रभर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. या दरम्यान अधिकारी-कर्मचारी डोळ्यात तेल घालून व रात्रीचा दिवस करून कार्यरत होते. रात्रभर बिबटय़ाने ताकास तूर लागू दिला नाही. मात्र, गुरुवारी सकाळी वन विभागाच्या प्रयत्नांना अखेर यश आले. सकाळी दहाच्या सुमारास बिबटय़ाला पुन्हा जेरबंद करण्यात वन विभागाने बाजी मारली. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी नाशिक व जुन्नर येथून तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी गुंगीच्या औषधाचा मारा बिबटय़ावर करण्यात आला. त्याचा अपेक्षित परिणाम झाला आणि नंतर बिबटय़ाला पकडण्यात आल्याचे जुन्नर येथील निवारा केंद्राचे अजय देशमुख यांनी सांगितले.
पहाटे तीनच्या दरम्यान बिबटय़ाला पकडण्यासाठी विशेष पथक दाखल झाले. बिबटय़ाने दबा धरलेल्या बांबूच्या बनात लोखंडी जाळी लावली. तत्पूर्वी बिबटय़ा वारंवार कोठे येत आहे, याची माहिती देशमुख व त्यांचे सहकारी घेत होते. सकाळी साडेनऊ वाजता देशमुख व महेंद्र डोरे या दोघांनी बिबटय़ाला हेरले. पहिला गुंगीच्या औषधाचा डोस असणारे इंजेक्शन बंदुकीद्वारे मारण्यात आले. भोवताली गोंगाट असल्याने सकाळी दहापर्यंत त्याचा परिणाम झाला नव्हता. सव्वादहा वाजता पुन्हा ‘ड्राट’ देण्यात आले. तरीही फरक न पडल्याने १० वाजून २० मिनिटांनी पुन्हा गुंगीचे औषध देण्यात आले, तेव्हा मात्र बिबटय़ा निपचित पडला. झाडीतून एका हुकद्वारे त्याला बाहेर काढण्यात आले. गुंगीच्या औषधाची मात्रा तशी जास्त झाली होती. त्यामुळे तातडीने अॅण्टीडोस दिल्याचे त्यांनी सांगितले.
येथील मुख्य वननिरीक्षक भोसले पूर्वी पुणे जिल्ह्य़ात कार्यरत होते. त्यामुळे तेथील तज्ज्ञांना त्यांनी आमंत्रित केले. बिबटय़ावर देखरेख ठेवण्यासाठी उपग्रह संदेश यंत्रणा असणारी चिप त्याच्या शेपटीत बसविण्यात आली.

Story img Loader