जिल्हय़ातील दारुबंदीच्या बाबतीत एक महिन्यात निर्णय घेऊ हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरल्याने महिला संघटनांनी गणराज्यदिनापासून जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष परोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सुमारे दोनशे महिलांनी शहरात रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला. या सर्वावर आधी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. आंदोलन करणाऱ्या महिलांनी अटक करा, असा आग्रह पोलिसांकडे धरला. दुपारी दोनच्या सुमारास सुमारे दीडशे महिलांना पोलिसांनी अटक केली. या सर्वाना येथील जिल्हा कारागृहात नेण्यात आले. तेथे जागेची अडचण निर्माण झाल्याने सुमारे शंभर महिलांना काल रात्री नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. जोपर्यंत मुखमंत्री वा त्यांच्या वतीने प्रशासनातील अधिकारी लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका या महिलांनी घेतली आहे. महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. राणी बंग काल येथे आल्या होत्या. जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा