गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील विद्यालयाच्या आवारात असलेल्या महाविद्यालयामुळे श्री जयरामभाई हायस्कूलची स्थिती ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी झाली आहे. महाविद्यालयातील टारगट मुलांकडून हाणामाऱ्या व मुलींची छेडछाड असे प्रकार वारंवार घडत असले तरी संस्था दुर्लक्ष करण्याची भूमिका घेते. व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यापलीकडे शाळेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. परिणामी, शालेय विद्यार्थ्यांसाठी टारगटांचा गोंधळ नेहमीची डोकेदुखी ठरला आहे.
नाशिक-पुणे महामार्गालगत नाशिकरोड परिसरात गोखले एज्युकेशन सोसायटीची श्री जयरामभाई हायस्कूल आहे. विद्यालयाच्यालगत संस्थेचे नामांकित महाविद्यालय व बँक आहे. या सर्व विभागाचा परस्परांशी संबंध येणार नाही याकरिता संस्थेने तारेचे कुंपण घातले आहे. हायस्कूलमध्ये सध्या दोन सत्र मिळून एक हजार ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. देवळाली गाव, भगूर, सिन्नर फाटा येथून काही विद्यार्थी येतात. त्यापैकी ६०० विद्यार्थी सायकल किंवा खासगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. विद्यार्थ्यांकडून मागणी न झाल्याने तसेच संस्था पातळीवर काही चर्चा न झाल्यामुळे शाळेने वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही. विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना कापडी बिल्ले दिले आहेत. या शिवाय विद्यालय महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर जाऊ नये किंवा घोळका करून उभे राहु नये यासाठी शाळा भरतांना, सुटतांना पोलिसांची गस्त परिसरात असते. या शिवाय शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक शिपाई आणि चार शिक्षक मुलांवर देखरेख करण्यासाठी उभे राहतात. रात्रीच्या वेळेत एका सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र सायकल वाहनतळाची तसेच पाणी पिण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराचे तीन विभाग करण्यात आले आहेत. त्यातून एका बाजुने मुले व दुसऱ्या बाजुने मुली जातात. मुख्य भागातून शिक्षकांची ये-जा सुरू असते. आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने शाळेच्या दोन्ही मजल्यावर तीन अग्निशमन नळकांडय़ा बसविण्यात आल्या आहेत. विद्यालयाच्या आवारात सी.सी. टीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय विचाराधीन आहे. तोपर्यंत सुरक्षेची भिस्त शिक्षक आणि शिपाई यांच्यावरच आहे. व्यवस्थापनाला आपली व्यवस्था चोख वाटत असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. संस्थेच्या विविध विभागाचा वावर एकमेकांच्या कक्षेत होऊ नये यासाठी व्यवस्थापनाने तयार केलेल्या कुंपणातून विद्यार्थ्यांकडून सर्वत्र मुक्त संचार होतो. विद्यार्थी किरकोळ वादात धडा शिकवण्यासाठी आपल्या वरिष्ठ म्हणजे महाविद्यालयीन मित्रांची मदत घेऊन शाळेच्या आवारात मारामाऱ्या करतात. ‘हिरोगिरी’ करणारी ही मंडळी मुलींची छेड काढण्यातही मागे राहत नाही. वारंवार असे प्रकार घडत असले तरी शाळेकडून संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे तक्रार करण्यापलीकडे आजवर कुठलीही कठोर पावले उचलली गेली नाहीत. दुसरीकडे, पोलिसांची गस्त असली तरी त्यांचा वचक नाही. शालेय व्यवस्थापन आणि पोलिसांनी संयुक्त उपाय केल्यास शाळेतील वातावरण अधिक सुरक्षित होऊ शकते.
मुले बेपत्ता होणे, विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न असे प्रकार गेल्या काही दिवसांत घडत असल्याने पोलीस यंत्रणेने शालेय व्यवस्थापनास विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिने दक्ष राहण्याची सूचना केली आहे. या घटनांमुळे पालक वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेची स्थिती नेमकी काय आहे, याचा
घेतलेला हा वेध.