जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजप राज्य कोअर कमिटी बैठकीत पक्षाची उमेदवारी निश्चित करून केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठविलेल्या १० उमेदवारांच्या यादीत दानवे यांचेही नाव असल्याचे भाजप जिल्हा सरचिटणीस (संघटन) देवीदास देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, दानवे यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीस ही निवडणूक या वेळेस सोपी जाणार असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी केला.
दानवे यांची उमेदवारी काँग्रेसला अनपेक्षित नाही. परंतु या वेळेस उमेदवारीसाठी भाजपमध्ये ते एकटेच इच्छुक नव्हते, हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, तसेच जि.प.च्या माजी अध्यक्षांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यामुळे दानवे यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या उमेदवारीत फरक आहे, असे डोंगरे यांनी या संदर्भात बोलताना स्पष्ट केले.
मागील सलग ५ निवडणुकांत भाजपचाच विजय झाला, याकडे लक्ष वेधले असता डोंगरे म्हणाले, की २००९मध्ये दानवे यांचा जवळपास साडेआठ हजार मताधिक्याने विजय झाला. परंतु काँग्रेस त्यांची सव्वाचार हजार मते कमी करू शकली असती तर वेगळे चित्र दिसले असते. १९९८मध्येही भाजपचा उमेदवार केवळ १ हजार ८०० अशा कमी मताधिक्याने विजयी झाला. १९९६ व १९९९मध्ये तिरंगी लढतीचा लाभ भाजपला झाला. परंतु २००४च्या सरळ लढतीत भाजपला १९९६ व १९९९च्या मताधिक्यापेक्षा जेमतेम निम्मेही मताधिक्य मिळाले नव्हते. या वेळेस परिस्थिती वेगळी आहे. कारण या मतदारसंघात सहापैकी पाच आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. भाजपचा एकही आमदार नसून शिवसेनेचा एकमेव आमदार बदनापूरमध्ये आहे. त्यामुळे दानवे यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपुढे असणार नाही. मागच्या निवडणुकीतच प्रचाराची व्यूहरचना करून आम्ही दानवे यांना पराभवाच्या काठावर नेऊन ठेवले होते. परंतु तो थोडक्यात टळला. आघाडीकडे दानवे यांना पराभूत करण्यासंदर्भात अनेक मुद्दे आहेत, असा दावाही डोंगरे यांनी केला.
जालना मतदारसंघावर राष्ट्रवादीने हक्क सांगितला असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधले असता डोंगरे म्हणाले, की तशी मागणी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे केली असेल. परंतु आमचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरविंदराव चव्हाण यांनी सांगितले, की जालन्याची जागा आघाडीत या वेळी राष्ट्रवादीने घ्यावी, असा आमचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जिल्हय़ातून तशी मागणी करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठी याबाबत जो निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही बांधील राहणार आहोत. त्यांच्या आदेशाचे पालन करणार आहोत. परंतु ही जागा या वेळेस राष्ट्रवादीस सोडावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Story img Loader