जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल ४०६ उमेदवार रिंगणात उभे ठाकल्याने बहुतांश प्रभागात तिरंगी, चौरंगी तसेच बहुरंगी लढती होणार आहे. प्रभाग रचना वेगळ्याच धाटणीची असल्यामुळे अनेक प्रस्थापित आणि प्रतिष्ठितांची प्रतिष्ठाच या निवडणुकीत पणाला लागली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी खांदेश विकास आघाडीचे प्रमुख, माजी महापौर, विद्यमान स्थायी समिती सभापती तसेच आ. सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन आपला प्रभाग बदलून २१ ब या प्रभागातून लढत आहेत. राष्ट्रवादीचे मुकुंद ठाकूर, भाजपचे मनेष बारी व काँग्रेसच्या जितेंद्र भामरे यांच्याशी त्यांची टक्कर आहे. भाजपच्या श्रीकांत खटोड यांनी येथून नाटय़मयरित्या माघार घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खटोड हे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या विश्वासातील मानले जात असताना त्यांच्या माघारीत कोणते गणित असावे, असा तर्क लावला जात आहे.
प्रभाग क्रमांक १० अ मधून शिवसेनेचे महानगरप्रमुख गजानन मालपुरे हे खांदेश विकास आघाडीकडून मैदानात असून भाजप नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे व राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर अत्तरदे यांच्याशी त्यांची लढत आहे. जळगाव नगरपालिका व महापालिकेतील गैरव्यवहार आणि बेकायदा ठरावांवर सातत्याने आवाज उठवून आ. सुरेश जैन गटालाच कायम हादरा देणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील महानगर विकास आघाडीकडून प्रभाग २० ब मधून रिंगणात आहेत. खांदेश विकास आघाडीच्या नवख्या अशा सुभाष सांखला यांच्याशीच त्यांची खरी लढत आहे. पाटील यांचा तुटलेला जुना प्रभाग, नवा विस्तारीत भाग त्यांना आव्हान ठरला आहे. त्यांचा कायमचा विरोध त्यांना साथ देतो की मतदार विरोधातील नगरसेवक झुगारतात, याकडे शहराचे लक्ष आहे. माजी महापौर विष्णु भंगाळे आणि जयश्री धांडे हे दोन्ही प्रभाग २४ मधून खान्देश विकासचे उमेदवार आहेत. त्यात भंगाळे हे आपला प्रभाग बदलून नव्या प्रभागात आले आहेत तर धांडे यांचा हा नेहमीचाच प्रभाग आहे. धांडे यांच्याबद्दल महापौर होऊनही प्रभागात कामे केली नसल्याची तक्रार केली जाते. भंगाळे यांच्या कामाबद्दल जुन्या मतदारसंघात काहिसे समाधान व्यक्त केले जाते. भंगाळे यांचा लाभ धांडे यांना होतो की धांडेंबद्दलची नाराजी भंगाळे यांना भोवते, हे मतदानानंतर स्पष्ट होईल. मनसेचे जिल्हाध्यक्ष तसेच आगामी विधानसभा जळगावमधून लढविण्यास उत्सुक असलेले ललित कोल्हे मनसेचे एकमेव विद्यमान नगरसेवक असून प्रभाग १७ ब मधून खांदेश विकासचे चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या किशोर माळी यांच्याशी त्यांची लढत आहे. जैन यांच्या नेतृत्वातील आघाडीच्या नगरसेविका सिंधू कोल्हे यावेळी मनसेच्या उमेदवार असून प्रभाग १८ ब मध्ये खांदेश विकासच्या मनिषा सोनवणे यांच्याशी त्यांची लढत आहे. पालिकेच्या घरकूल गैरव्यवहार प्रकरणात कोल्हे या संशयित असून जैन गटाच्या विरुद्ध जाऊन त्या माफीच्या साक्षीदार झाल्याचे म्हटले जाते. ललित कोल्हे यांचे वडील माजी ज्येष्ठ नगरसेवक व आ. जैन यांचे माजी सहकारी हे प्रभाग बावीस ब मधून रिंगणात आहेत. भाजपच्या किशोर चौधरी आणि त्यांच्यात लढत होईल, असे चित्र आहे. मनसेचे दुसरे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे हे प्रभाग ३० ब मधून खान्देश विकास आघाडीचे उमेदवार माजी महापौर सदाशिव ढेकळे यांच्याशी टक्कर देत आहेत. तसेच माजी नगराध्यक्षा पुष्पा पाटील, भाजपचे महानगरप्रमुख सुरेश भोळे, माजी उपमहापौर भारती सोनवणे आदी आपापले पक्ष किंवा आघाडय़ांकडून रिंगणात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणारेही अनेक जण आहेत. महापालिकेची ही तिसरी निवडणूक घरकुल प्रकरणाने गाजत असली तरी सर्व पक्ष व आघाडय़ात त्या प्रकरणातील संशयित असल्याने घरकुल मुद्दा प्रचारात नाही.
प्रस्थापितांची प्रतिष्ठा पणाला..
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल ४०६ उमेदवार रिंगणात उभे ठाकल्याने बहुतांश प्रभागात तिरंगी, चौरंगी तसेच बहुरंगी लढती होणार आहे. प्रभाग रचना वेगळ्याच धाटणीची असल्यामुळे अने
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-08-2013 at 09:20 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon corporation election