जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत असून कोण, कोणत्या पक्षाला जवळ करेल, हे सध्यातरी सांगणे अवघड झाले आहे, अशी परिस्थिती आहे.
या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या मतलबी राजकारणाचे दर्शन घडले. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे जरी खरे असले तरी नेत्यांनी निदान आपल्या पक्षाची निष्ठा, स्वाभिमान जपावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. जिल्हा बँक संचालक मंडळाची निवडणूक चार वर्षांपूर्वी ईश्वरलाल जैन यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व नेते तेव्हा एकत्र होते. आघाडीचे शेतकरी पॅनल विरुद्ध एकनाथ खडसे आणि सुरेश जैन या युतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनल अशी लढत झाली होती. शेतकरी गटाला ३१ पैकी २० जागा मिळाल्या होत्या. संचालकांच्या आग्रहास्तव खा. जैन अध्यक्षपदी विराजमान झाले. वर्षभरातच सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी जाहीरपणे खा. जैन यांच्यावर टीकास्त्र सोडले. जैन व चौधरी यांच्यातील वितुष्ट पुढे वाढत गेले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटनाक्रमामुळे जैन यांच्याविरुद्ध पक्षातही तक्रारी वाढत गेल्या. पुढे विधान परिषद निवडणुकीत जैन यांनी मुलालाच अपक्ष म्हणून चौधरी यांच्या विरोधात रिंगणात उतरविले. युतीचे उमेदवार म्हणून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे पुत्र मैदानात होते. या वेळी आ. जैन यांनी खासदारांच्या मुलाला मदत केली. या लढतीत खासदारपुत्र विजयी झाले. तेव्हापासून दोन्ही जैन एकत्र आल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे खडसे आणि आ. जैन या युतीच्याच नेत्यांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. खडसे विरुद्ध सुरेश जैन आणि ईश्वरलाल जैन विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय वैमनस्याचा चौकोन तयार झाला.
महापालिकेच्या कोटय़वधींच्या घरकुल गैरव्यवहाराचे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे नेत खडसे यांनी मुलाच्या पराभवाचा वचपा काढल्याचे म्हटले जाते. त्याचाच परिणाम म्हणून आ. सुरेश जैन सहा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. काँग्रेस मात्र या सर्व प्रकारापासून दूर असून जिल्ह्यातील सर्वात दुर्बल पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. मध्यंतरीच्या काळात जिल्हा बँकेत शेतकरी विमा, संगणक खरेदी, अमळनेर येथील बँकेच्या भूखंडाचे मूल्यांकन व यावलच्या सूत गिरणी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांनी याविरोधात आवाज उठविला होता. खा. जैन आणि डॉ. सतीश पाटील हे तत्कालीन अध्यक्ष यात गुरफटल्याचा जाहीर आरोप करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीत चिमणरावांनी १६ मते मिळवून अध्यक्षपद पटकावले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने त्यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जैन हेच हीरो ठरले आहेत.
राष्ट्रवादीचे संचालक माजी आमदार संतोष चौधरी आणि खा. जैन यांची गळाभेट या निवडणुकीत झाली, तर सुरेश जैनांशी वैमनस्य असलेल्या खडसे यांचीही मते सेनेच्या पारडय़ात पडली, असे विचित्र, अनपेक्षित व आश्चर्यकारक चित्र पाहता येथील नेत्यांच्या मतलबी राजकारणाची चर्चा सुरू आहे. महापालिका तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या नेत्यांमध्ये तह झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री गुलाब देवकर मात्र या राजकारणात एकाकी व निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे.
जळगावच्या नेत्यांचे मतलबी राजकारण
जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत असून कोण, कोणत्या पक्षाला जवळ करेल, हे सध्यातरी सांगणे अवघड झाले आहे, अशी परिस्थिती आहे.
First published on: 14-10-2012 at 02:04 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon jalgaon bank bank bank election