तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना या पंचवार्षिकातील शेवटचे अध्यक्ष नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष रावसाहेब पाटील हे राजीनामा देण्याची शक्यता असल्याने आ. सुरेश जैन गटाकडून भरत बोरसे यांचे नाव चर्चेत आहे.
महापालिका निवडणूक ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता असून त्यानंतर तालुका बाजार समितीची निवडणूक होणार आहे. समितीचा संबंध तालुक्यातील शेतकऱ्यांसह महापालिका क्षेत्रात प्रभाव टाकणाऱ्या काही राजकारण्यांशीही असल्याने निवडणुकीचे गणित जुळविण्यास आतापासून सुरुवात झाली आहे. बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत आ. सुरेश जैन गटाचे १७ पैकी १४ संचालक निवडून आले होते. माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भिला सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे त्यांच्यासह मच्छिंद्र पाटील व विलास पाटील हे तीनच संचालक विजयी झाले होते. यापैकी भिला सोनवणे हे सध्या जैन गटात आहेत. जैन यांच्या नेतृत्वात गेल्या वेळी निवडणूक झाल्यावर बळीराम सोनवणे, भरत बोरसे, रावसाहेब पाटील व भगवान सपकाळे यांना अध्यक्षपदासाठी संधी देण्याचे जैन यांनी ठरविले होते. मात्र सोनवणे यांनी तीन वर्षे ते पद सांभाळले. गेल्या वर्षी त्यांनी राजीनामा दिल्यावर रावसाहेब पाटील यांना संधी देण्यात आली होती. रावसाहेब पाटील यांचा नियोजित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते पुढील महिन्यात राजीनामा देण्याची शक्यता असल्याने नवीन अध्यक्ष कोण या विषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी भरत बोरसे यांचे नाव आघाडीवर असल्याचे जैन गटाकडून सांगितले जाते. भिला सोनवणे यांचीही यासाठी तयारी सुरू झाली असली तरी त्यांची धरसोड वृत्ती आणि बाजार समितीतील उच्चाधिकारी समितीचे शरद लाठी यांचा त्यांना विरोध असल्याचे समजते.

Story img Loader