राज्यभरात गाजलेला जळगाव महापालिकेचा घरकुल घोटाळा असो की अन्य कोणतेही घोटाळे अथवा गैर व्यवहार.. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हे मुद्दे कितपत प्रभावी ठरतील अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण, सर्वसामान्य मतदाराला त्याच्याशी फारसे देणेघेणे नसल्याचे चित्र असल्याने केवळ उमेदवाराची प्रतिष्ठाच त्यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसत आहे.
पालिकेचा घरकुल घोटाळा आजही संपूर्ण राज्यात गाजत आहे. या घोटाळ्या प्रकरणी आ. सुरेश जैन यांच्यासह त्यांचे सहकारी प्रदिप रायसोनी आजही न्यायालयीन कोठडीत आहे. सुमारे दीड वर्षांपासून सुरेश जैन जळगाव शहरात नाहीत. वास्तविक त्यांच्या अनुपस्थितीत दर सहा महिन्यांनी महापालिकेत त्यांच्या गटाच्या तिघांना महापौर पदाची संधी मिळाली. हा मुद्दा महत्वाचा म्हटला जातो. महापालिकेचा घरकुल हा एकच घोटाळा अद्याप चर्चेत आहे.
वाघुर पाणी पुरवठा, विमानतळ विकास व रस्ते डांबरीकरण यातील घोटाळे अद्याप पोलीस ठाण्यापर्यंत गेलेले नाहीत. हे घोटाळे आज नाही तर उद्या चर्चेत येतील. त्या अनुषंगाने संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणेही निश्चित आहे. घोटाळ्यांच्या कोलाहलात महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. कोटय़वधींच्या घोटाळ्यांमुळे पालिकेतील सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील गटच प्रामुख्याने अडचणीत आला. त्यात गटाचे नेते, उपनेते, बरेच आजी-माजी नगरसेवक, माजी महापौर अडकले आहेत. या परिस्थितीत सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खांदेश विकास आघाडीकडेच शहरातील बहुतांश इच्छुकांची गर्दी पहावयास मिळाली. या आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मोर्चेबांधणी केली गेली. वास्तविक सुरेश जैन शहरात नाहीत. उच्चाधिकार समितीचे रायसोनीही कारागृहात आहेत. अन्य घोटाळे व गैरव्यवहारांची तलवार डोक्यावर टांगलेली अशा स्थितीत जैन गटाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. पण त्या उलट स्थिती दिसून येते.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पालिकेतील घोटाळ्यांचे मुद्दे मुख्यमंत्री व विधानसभेपर्यंत नेले. या बाबत उल्हास साबळे व नरेंद्र पाटील तक्रारदार असले तरी घोटाळ्यांवरील कारवाईचे श्रेय खडसे यांना जाते. खडसे यांच्या आजवरच्या कामकाजाची पध्दत बघता पालिका निवडणूक एकनाथ खडसे व जळगाव भाजपभोवती फिरायला हवी होती. मात्र तसेच चित्र न दिसता शिवसेनेशी युती नसलेल्या व स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपकडे सर्वच्या सर्व ७५ जागांसाठी प्रबळ उमेदवार मिळतात काय, हा प्रश्न आहे. माजी पालकमंत्री गुलाब देवकर यांच्याकडे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सूत्रे आहेत. वास्तविक देवकर हे सुध्दा घरकुल घोटाळ्यातील एक संशयित आरोपी असून त्या प्रकरणी त्यांना अटक झाली होती. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या जामीन उच्च न्यायालयाने नाकारला व त्या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयालयात गेले आहेत. या दरम्यान देवकरांचे मंत्रीपदही गेले. घरकुल गैर व्यवहाराचा गुन्हा २००६ मध्ये दाखल झाला व त्यावर प्रत्यक्ष कारवाई जानेवारी २०१२ मध्ये सुरू झाली. त्यानंतरच्या घडामोडींनी शहरातील नागरिकांची मोठी करमणूक झाली. आता फटाक्यांची माळ एकदम वेगाने फुटावी व मागे राहिलेला एखादा फटाका मध्येच फुटावा तशी घरकुलच्या माध्यमातून येणाऱ्या घडामोडींची स्थिती आहे. महत्वाची बाब म्हणजे, पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून घरकुल गैरव्यवहार व घोटाळ्याचे मुद्दे बाजुला पडल्याचे दिसू लागले आहे. त्या त्या प्रभागातील आजी-माजी नगरसेवक व त्यांचे समर्थक कार्यकर्ते म्हणून पुन्हा उत्साहात फिरायला लागले आहेत.
जळगाव महापालिका निवडणूक : प्रचारात नेमके कोणते मुद्दे प्रभावी ठरणार याबद्दल उत्सुकता
राज्यभरात गाजलेला जळगाव महापालिकेचा घरकुल घोटाळा असो की अन्य कोणतेही घोटाळे अथवा गैर व्यवहार.. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हे मुद्दे कितपत प्रभावी ठरतील अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.
First published on: 08-08-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon municipal election curiosity about exactly what the issue be effective