जळगावमधील जांभूर गावामध्ये रविवारी सकाळी एका विहिरीतील स्फोटात दोन गंभीर जखमी रुग्णांना सोमवारी रात्री उपचारासाठी नागपुरात आणल्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातील एकाचा उजवा डोळा, तर दुसऱ्याचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्य़ातील जांभूर गावामध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशाच एका शेतामधील विहिरीमध्ये रविवारी सकाळी चार युवक उतरले. विहिरीतील दगड फोडत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यात प्रकाश रांगडे आणि दिवाकर ओडके हे दोघे दगावले आणि मनोहर दाते (१९) व श्याम करंगले (१८) हे दोन युवक त्यातून बचावले. दोन्ही गंभीर जखमींना तात्काळ जळगावमधील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांकडून  मिळल्याने सोमवारी रात्री मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांच्या हातापायाला किरकोळ मार असला तरी डोळ्यांना मात्र गंभीर इजा झाली आहे.
अठरा वर्षीय श्याम करंगले बारावीत असून घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने तो मोलमजुरीची कामे करतो. निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या श्याम रविवारी सकाळी मित्र मनोहर दाते यांच्यासोबत विहीर साफ करण्याच्या कामाला निघाला. मनोहर दाते याच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून तो मोलमजुरी करतो. श्याम करंगले याची आई रुख्मा करंगले यांनी सांगितले, घटना घडल्यानंतर एक तासाने माहिती मिळाली. तोपर्यंत गावातील लोकांनी रुग्णालयात दाखल केले होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरात कोणी कमावणारे नाही, त्यामुळे हाच एक आधार होता. जळगाव आणि अकोल्याच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या ठिकाणी उपचार झाले नाहीत. त्यामुळे एका डॉक्टरांनी नागपूरला मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले आणि सोमवारी रात्री दोघांनाही मेडिकलमध्ये आणण्यात आले. श्यामचा उजवा डोळा गेला असून डाव्या डोळ्याने अंधूक दिसत आहे. मनोहरच्या दोन्ही डोळ्यांवर गंभीर इजा झाली असून दृष्टी येणे अशक्य आहे. जे दोघे या घटनेत दगावले ते आमच्या गावातील असून चांगले मित्र होते. चौघे मिळून एकत्र काम करीत होते. मित्रांच्या मृत्यूचा दोघांनाही जबर धक्का बसला असून त्यातून अद्याप दोघेही सावरलेले नाहीत.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अशोक मदान म्हणाले, मनोहर दातेचा एक डोळा स्फोटामुळे बाहेर निघाला असून पूर्णपणे निकामी झाला आहे. दुसऱ्या डोळ्यात दगडाचे तुकडे आणि स्फोटक पदार्थ गेले आहेत, तर श्यामचा उजवा डोळा निकामी झाला असून डावा डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. दोघांच्या डोळ्यांवर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. श्यामला किमान एका डोळ्याने दिसता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या बुबुळ आणि रॅटिनाला जबर मार लागला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
रविवारी सकाळी घटना घडल्यानंतर रक्तस्राव बराच झाला आहे. जळगाव आणि अकोलामध्ये वेळीच उपचार न झाल्यामुळे शस्त्रक्रिया करणे कठीण झाले होते, मात्र नेत्रविभागाच्या डॉक्टरांनी प्रयत्न करून डोळ्यात असलेले बारीक दगडाचे तुकडे आणि स्फोटक पदार्थ काढण्यात यश मिळविले आहे. सध्या काहीच सांगता येत नाही, मात्र श्यामला दृष्टी मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. मदान यांनी सांगितले.