जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा मनोदय ज्येष्ठ नेते, जि. प.चे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर यांनी पत्रकार बैठकीत बोलून दाखविला.
भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे किंवा अन्य कोणाही नेत्यास उमेदवारी मिळाली तर आपण प्रामाणिकपणे त्यांचे काम करू. आपण कोणाच्याही विरोधात नसून निवडून येण्याची क्षमता असल्याने स्वत:साठी उमेदवारी मागत आहोत. पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्याशी आपण बांधील राहणार आहोत, अशी पुस्तीही बांगर यांनी जोडली.
मागील १२ वर्षांपेक्षा अधिक काळ आपण भाजपमध्ये आहोत. या पूर्वी भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष, तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य राहिलो आहोत. अनेक कार्यकर्त्यांनी आपणास लोकसभेची उमेदवारी मागावी, असा आग्रह धरला. मतदारसंघात परिचय व संपर्क पाहून ही उमेदवारी आपणास मिळावी, अशी इच्छा बांगर यांनी व्यक्त केली. सन १९९८मध्ये आपण जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली. त्यावेळी केवळ १ हजार ८०० मतांनी पराभव झाला. तसेच १९९९मध्ये झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीतही आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो, असे ते म्हणाले.

Story img Loader