सध्या प्रसिद्धीमाध्यमे खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु त्यांची ही भूमिका केवळ शहरी भारतापुरती आणि त्यातही भ्रष्टाचार-गुन्हेगारीसारख्या विषयांवर प्रकाशझोत टाकण्यापुरती मर्यादित आहे. त्यात ग्रामीण भागातील समस्या, तेथे स्वयंसेवी संस्थांकडून केले जाणारे कार्य, ते करीत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी आदी बाबींना फारसे महत्त्व दिले जात नाही. परिणामी ‘इंडिया’च्या प्रभावाखाली ‘भारता’चा आवाज दबतोय, अशी खंतवजा मनोगत यंदाच्या ‘जमनालाल बजाज पुरस्कार’विजेत्यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
प्रसिद्धीमाध्यमांचा सध्याच्या तरुण पिढीवर प्रचंड प्रभाव आहे. तरूण पिढीला समोर ठेवून स्वत:ची उत्पादने अधिकाधिक विकली जावीत यासाठी प्रसिद्धीमाध्यमांचा पुरेपूर उपयोग केला जातो. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून जर ग्रामीण भारताकडे आणि तेथे सुरू असलेल्या विधायक कार्यावर प्रकाशझोत टाकला, तर तरुणपिढी चंगळवादाऐवजी समाजसेवेसारख्या विधायक कार्याकडे वळण्यास मदत होईल हे स्पष्ट करताना प्रसिद्धीमाध्यमांकडून त्याचा पाठपुरावा नक्कीच केला जाईल, असा आशावादही या पुरस्कारविजेत्यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारप्रणालीचे पुरस्कर्ते तसेच आंध्र प्रदेशात विनोबा भावेंच्या भूदान चळवळीच्या पाश्र्वभूमीवर ग्रामदान चळवळ उभारणारे ग्रामदान निर्माण समितीचे अध्यक्ष जी. व्ही. सुब्बाराव, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे ग्रामीण विकासासाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या स्नेहलता नाथ, ग्रामीण भागांतील महिला आणि बालकल्याणासाठी झटणाऱ्या विद्या दास तसेच फ्रान्समध्ये असहकार चळवळ उभी करणारे ज्यां-मरी-मुलर यांना यंदाच्या ‘जमनालाल बजाज पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्यापूर्वी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बातचीत करताना आणि ग्रामीण भागात कार्य करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यातही यशस्वीपणे सुरू असलेली वाटचालीची माहिती त्यांनी दिली. त्या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडून बजावण्यात येणाऱ्या भूमिकेबाबतही त्यांनी आपली परखड मते मांडली. त्याचवेळी हाती असलेल्या अस्त्राच्या माध्यमातून तरूण पिढीला समाज वा विधायक कार्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्याची हाकही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना घातली.
एकीकडे वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपसूकच आधी गांधींच्या असहकार चळवळीत व नंतर विनोबांच्या भूदान चळवळीत सहभागी होण्याची संधी मिळाल्याचे सांगणाऱ्या सुब्बाराव यांनी आताच्या पिढीमध्ये त्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी प्रसिद्धीमाध्यमांवर असल्याचे सांगितले. तर गांधींजींच्या असहकार चळवळीचा धागा पकडून फ्रान्समध्ये गांधीविचारांचा प्रसार करणाऱ्या मुलर यांनी या वेळी गांधींजीची मूल्ये, त्यातही असहकाराचे तत्त्व वैश्विक स्तरावर नेण्याची गरज बोलून दाखवली. फ्रान्ससह सध्या अनेक देशांत गांधींच्या या तत्त्वाचा पुरस्कार केला जात आहे. फ्रान्समध्ये तर वादविवाद सोडविण्यासाठी या तत्त्वाचा उपयोग करण्याचे शिक्षण शालेयजीवनापासूनच देण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रकारचे कार्य करताना पैशांचा मोठा प्रश्न असला, तर ते करण्याची इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. हिंसेचा मार्ग अवलंबून जगाचा इतिहास नष्ट होण्यापासून वाचविण्याचा एकमेव मार्ग म्हणून त्यांनी गांधी तत्त्वांकडे वळण्याचेही आवाहन केले. इराक आणि इस्रायलमध्येही सध्या गांधी तत्त्वप्रमाणालीवर मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू असल्याचे मुलर यांनी सांगितले.

Story img Loader