शेतीक्षेत्राशी आपली नाळ घट्ट बांधली आहे. त्यामुळे आपल्याला कितीही विशेषणे मिळाली, तरीही शेतकरी हीच आपली ओळख आणि आपण शेतकरी आहोत, हीच बाब मला भूषणावह वाटते. शेतकरी हेच माझ्यासाठी अस्सल विशेषण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी केले.
पद्मश्री महानोर यांना यंदाचा रावसाहेब जामकर स्मृतिगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर डॉ. के. सी. पारख, नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर, अॅड. बाळासाहेब जामकर, अॅड. किरण सुभेदार, विजय जामकर आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना महानोर म्हणाले, की रावसाहेब जामकर यांच्या पुढाकाराने परभणीत साहित्यसंमेलन, नाटय़संमेलन आदी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यामुळे त्यांना संमेलनमहर्षी असे म्हटले जात असे. परभणीलाही संमेलननगरी असे नाव पडले. जामकर हे कृषिमंत्री असताना जलसंधारण व फलोद्यान क्षेत्रात त्यांच्या काळात राज्याला दिशादर्शक कामे झाली.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमात पळसखेडा येथे पहिल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन जामकर यांच्या हस्ते झाल्याची आठवण महानोर यांनी सांगितली. कबड्डी खेळातही ते विद्यार्थिदशेपासून अग्रेसर राहिले आणि त्यांचे पुण्यस्मरण कबड्डी खेळाने व्हावे, ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे, अशी भावनाही महानोर यांनी व्यक्त केली. डॉ. पारख व संग्राम जामकर यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार निवड समितीचे सदस्य देवीदास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मल्हारीकांत देशमुख यांनी महानोर यांचा परिचय करून दिला. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. संगीता अवचार यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा