जनतेच्या हितासाठी आवश्यक असणारे सर्व मुददे राज्यसभेत मांडलेल्या जनलोकपाल विधेयकात असल्याने आपण समाधानी आहोत, मात्र ज्यांना कुणाला हे विधेयक मान्य नसेल त्यांनी उर्वरित मुद्दय़ांसाठी स्वतंत्रपणे आंदोलन करावे असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता लगावला.
राज्यसभेत सरकारने मांडलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या मसुदयावर हजारे यांनी शनिवारी समाधान व्यक्त केल्यानंतर ‘आप’चे केजरीवाल, कुमार विश्वास व प्रशांत भूषण यांनी हे विधेयक सक्षम नसल्याचे सांगत हजारे हे सत्ताधाऱ्यांना शरण गेले आहेत, तसेच त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांची दिशाभूल करीत आहेत असे सांगत विधेयकाला विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर ‘आप’च्या मुद्दय़ांचे हजारे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना खंडन केले.
श्री. हजारे म्हणाले, दिल्ली येथील रामलीला मैदानावरील उपोषणाच्यावेळी आपण पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात जनतेची सनद, प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील अधिकारी व कर्मचारी लोकपालच्या कक्षेत घेणे व प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी केली होती. यापैकी दोन मुद्दयांचा समावेश राज्यसभेत सादर केलेल्या मसुदयात केला आहे. तसेच ‘जनतेची सनद’ या कायदयासाठी लोकसभेत स्वतंत्र विधेयक मांडण्यात आले आहे. त्यामुळे आपले समाधान झाले आहे.
राज्यसभा व लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसून सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त करून ज्यांना कोणाला विधेयकातील मसुदा सक्षम वाटत नसेल त्यांनी आपल्याप्रमाणेच उर्वरित मुद्दय़ांसाठी स्वतंत्र आंदोलन उभे करावे असे सांगत श्री. हजारे म्हणाले की यापूर्वीही आपण केलेल्या आंदोलनामुळे सात कायदे मंजूर झाले आहेत. कोणाचाही सल्ला न घेता या कायदयांसाठी आपण पाठपुरावा केला होता. जनलोकपालचा राज्यसभेत सादर झालेला मसुदा आपण वाचला आहे, त्यामुळे आपली कोणी दिशाभूल करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी कॉंग्रेस व भाजपा या दोन प्रमुख पक्षांनी समर्थन दिले आहे. इतर लहान पक्षांनी विरोध केला तरी काहीच फरक पडणार नाही असे सांगत संसदेच्या अधिवेशनाला अजून पाच दिवस बाकी आहेत या काळातच जनलोकपाल विधेयक मंजूर होईल अशी अपणास आशा आहे. मात्र या कालावधीत हे विधेयक मंजूर न झाल्यास अधिवेशनचा कालावधी वाढवावा, राज्यसभेत गोंधळ झाल्यास हे विधेयक गोधळात मंजूर करावे व लोकसभेची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी विधेयकाचे रूपांतर कायदयात करावे असे ते म्हणाले. राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल, ग्रामसभांना अधिकार, शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांच्या हितासाठीच्या अनेक कायदयांसाठी आपणास पुढेही लढा दयायचा असल्याने मी इतक्या लवकर मरणार नाही.
उंदीरच काय वाघही तुरूंगात जाईल- बेदी
राज्यसभेत मांडलेल्या जनलोकपाल विधेयकामुळे उंदीरदेखील तुरूंगात जाणार नसल्याचे केजरीवाल यांनी सांगितले होते. यावर त्यांचा समाचार घेत या विधेयकातील मसुदयाचा आम्ही अभ्यास केला असून विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर उंदीरच काय वाघदेखील तुरूंगात जाईल असे मत माजी सनदी अधिकारी किरण बेदी यांनी व्यक्त केले. हजारे यांचा मार्ग कायदयाचा आहे तर केजरीवाल यांचा मार्ग मुद्दय़ांचा आहे. त्यांना या प्रश्नात राजकारण करायचे आहे, तर हजारे यांना चळवळ पुढे न्यायची आहे. विधेयकातील मसुदयाचा प्रश्न सरकारशी निगडीत असल्याने केजरीवाल यांनी मसुदयाबाबत सरकारशी भांडावे असा सल्लाही बेदी यांनी दिला.

Story img Loader