समाजवादी पक्ष वगळता सर्व पक्षांचा जनलोकपाल विधेयकास पाठिंबा मिळत असल्याने या अधिवेशनात हे विधेयक संमत होईल असा विश्वास माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी राळेगणसिद्घी येथे बोलताना व्यक्त केला. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे बेदी यांनी शनिवारी राळेगणसिद्घीत येऊन हजारे यांच्यासमवेत सकाळपासून उपोषणास प्रारंभ केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बेदी यांच्यासमवेत प्रसिद्घ चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड यांनीही हजारे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी दिल्लीत उपोषण केले त्यावेळी आपण त्यांच्या त्याग पाहून प्रभावित झाल्याचे नमूद करून बेदी म्हणाल्या, अण्णांवरील प्रेमापाटी, त्यांच्या कार्यातून मिळालेल्या  उर्जेमुळे जीवनात प्रथमच आपण उपोषण करीत आहोत. आपले हे उपोषण दोन दिवस असेल असेही त्यांनी सांगितले.
‘अण्णांनी मागील वेळेस दिल्लीत याच मागणीसाठी उपोषण केले त्याच वेळी जनलोकपाल मंजूर होण्याची चिन्हे होती परंतु ही संधी थोडक्यात हुकली. अण्णांसोबत कोणताही पक्ष नसला  तरी सर्वसामान्य जनता त्यांना सोडणार नाही, यावेळी अण्णांच्या लढयाला, त्यांच्या तपश्चर्येला नक्कीच यश मिळणार असून या विधेयकाचे कायदयात रूपांतर झाल्यानंतर भ्रष्टाचारी लोकांना चांगलाच चाप बसेल. भ्रष्टाचारामुळे आतापर्यंत देशाचे अब्जावधी रूपयांचे नुकसान झाले असून त्याच्या झळा सर्वमान्यांना बसत आहेत’, असे त्या म्हणाल्या.
‘या कायदयामुळे सीबीआय सारखी यंत्रणा लोकपालाच्या नियंत्रणाखाली येईल. सध्या सीबीआयचा वापर सत्ताधारी स्वत:च्या हितासाठी मोठया प्रमाणावर करतात. त्याला आळा बसेल. लोकपाल  समितीमध्ये चार बुद्घीवादी व चार न्यायाधीशांचा समावेश असेल या लोकांची समिती आलेल्या तक्रारींची शहानिशा करून दोषींवर कारवाईची शिफारस करील’. असेही बेदी यांनी सांगितले.

Story img Loader