काँग्रेसने गेल्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात मतदारांना दिलेल्या आश्वासनांची केंद्र व राज्यातील सरकारने वचनपूर्ती केली. याची माहिती जनजागरण यात्रेतून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी औरंगाबाद जिल्ह्य़ात बोलताना सांगितले. केंद्र व राज्यातील सरकारांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी विकास योजना राबविल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला भरभरून यश मिळेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनजागरण यात्रा सुरू करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रथाची फीत कापून याचा प्रारंभ करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मोदींवर जोरदार टीका
जनजागरण यात्रेच्या माध्यमातून राज्यातील ४८ ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली. पंतप्रधानपदावर बसण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून ते फिरत आहेत. मात्र, त्यांच्या राज्यात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. परंतु राज्याला संकटात वाऱ्यावर सोडून स्वत:ची महत्त्वाकांक्षा साधण्यासाठी ते संधीसाधूपणाने फिरत आहेत, असा टोला चव्हाण यांनी लगावला.
प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी या वेळी मुख्यमंत्री चव्हाण कर्तबगार असून आपल्या पारदर्शक कामामुळे राज्याचा विश्वास त्यांनी संपादन केला असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या आहेत, असेही ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा सदस्यांच्या संख्याबळावर काँग्रेसने आघाडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मागे पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने एकहाती वर्चस्व राखलेल्या या मतदारसंघात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळीक, आमदार कल्याण काळे, अब्दुल सत्तार, सुभाष झांबड व एम. एम. शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, माजी मंत्री अशोक डोणगावकर, माजी खासदार रामकृष्ण पाटील, माजी आमदार कैलास चिकटगावकर यांच्यासह नेते, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वैजापूर काँग्रेसकडेच!
वैजापूर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार, या प्रचाराचा समाचार घेताना ही जागा काँग्रेसकडेच राहील, असे चव्हाण व ठाकरे या दोघांनीही या वेळी स्पष्ट केले. येथून माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांना पक्षाची उमेदवारी देण्याची घोषणाही चव्हाण यांनी या यात्रेनंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात केली. चव्हाण यांच्या या घोषणेमुळे येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढविणार, या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा