पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असताना जायकवाडी धरणात मात्र जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून तातडीने जायकवाडीत पाणी सोडावे, या मागणीसाठी मंगळवारी शहरात विविध आंदोलने करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात असतानाच झालेल्या या आंदोलनांमुळे पाणीप्रश्नाची धार चांगलीच तीव्र झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत सर्व बाबी तपासून मुंबईत निर्णय घेण्यात येईल, असे कोरडेच आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न केला.
सत्ताधारी काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांचे उपोषण, जायकवाडी पाणी संघर्ष समितीचा सर्वपक्षीय व विविध संघटनांसह मोर्चा यामुळे मंगळवारी दिवसभर पाणीप्रश्न चर्चेचा विषय होता. पावसाळा संपत आला असताना जायकवाडीत फक्त २२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. तांत्रिक बाबी तपासून जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मुंबईतील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी या प्रश्नी सोमवारी सुरू केलेले उपोषण मंगळवारी सकाळी मागे घेतले. समन्यायी पाणीवाटप करून हा प्रश्न सुटावा, अशी भूमिका घेत काळे यांनी हे उपोषण सुरू केले होते. मुख्यमंत्री चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आदींनी निरालाबाजार येथून उपोषणस्थळी येत काळे यांना हे आश्वासन दिले.
आमदार एम. एम. शेख, अॅड. सय्यद अक्रम, शारदा जारवाल आदींनी उपोषणात भाग घेतला. दरम्यान, पालखेड व वाघाड धरणांतून नारंगी-सारंगी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणीही उपोषणकर्त्यांनी लावून धरली. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
जायकवाडी संघर्ष समितीचा मोर्चा
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीतर्फे मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी जायकवाडीत सोडण्यासाठी क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोठा मोर्चा नेण्यात आला. शिवसेना वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, रिपब्लिकनसह इतर सर्वच पक्षांचे, संघटनांचे नेते, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. जयाजीराव सूर्यवंशी, अॅड. प्रदीप देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे, कम्युनिस्ट पक्षाचे उद्धव भवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद आलम, खमरखान यांच्यासह सुमारे अडीच हजार नागरिक सहभागी झाले होते.
वैजापूरकरांचा अपेक्षाभंग!
वैजापूर शहर व लगतच्या २२ गावांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी यातायात करावी लागत आहे. मात्र, पाणी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडूनही निव्वळ आश्वासनाशिवाय पदरात काहीच पडले नाही. नारंगी-सारंगी मध्यम प्रकल्पात पालखेड डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना पूर्वीच दिला होता. पालखेडचे पाणी नारंगी-सारंगी प्रकल्पात सोडल्यास वैजापूरसह २२ गावांना पावसाळ्यात भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे चित्र होते. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. परिणामी वैजापूरचे रहिवासी संतप्त झाले. माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुख्यमंत्र्यांची या प्रश्नी भेट घेऊन निवेदन देऊन लक्ष वेधले. परंतु पाणीप्रश्नी बैठक बोलवू, या आश्वासनापलीकडे वैजापूरकरांच्या पदरात ठोस काही पडले नाही.
जायकवाडी पाणीप्रश्न आंदोलनांमुळे ऐरणीवर!
पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असताना जायकवाडी धरणात मात्र जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून तातडीने जायकवाडीत पाणी सोडावे, या मागणीसाठी मंगळवारी शहरात विविध आंदोलने करण्यात आली.
First published on: 18-09-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayakwadi water agitation