मराठवाडय़ास न्याय्य हक्कानुसार पाणी मिळावे, या साठी मराठवाडा, नाशिक-नगर, तसेच राज्य सरकारचा एक प्रतिनिधी असणारी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना दौऱ्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. पवार यांना या दौऱ्यात विविध पक्ष-संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी निवेदने दिली.
बाभळी बंधाऱ्याच्या पाणी वापरासंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे जायकवाडीतील मराठवाडय़ाच्या हक्काच्या पाण्यासाठी त्रिसदस्यीय पाणी वापराबाबत त्रिसदस्यीय समिती नेमली पाहिजे. समितीने करार करून विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या मदतीने पाणी वापर कराराची दरवर्षी अंमलबजावणी करावी. मराठवाडय़ातील जनतेस हक्काचे पाणी मिळावे, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे खोतकर यांनी निवेदनात म्हटले आहे. जिल्ह्य़ातील कृषी, वीजविषयक प्रश्नांकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादीचे निवेदन
दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत जालना लोकसभा मतदारसंघ इंदिरा काँग्रेसकडे असला, तरी तो यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडवून घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरविंद चव्हाण यांनी पवार यांना दिले. शहरातील पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने ते पूर्ववत सुरू करण्यासाठी वीजबिल माफ करावे, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी केली. राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य बाळासाहेब वाकूळणीकर यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. फळबाग शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळावा, कापसाला प्रतिक्विंटल सात हजार रुपये हमी भाव द्यावा, सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय प्रवर्गात करावा, अशी मागणी करणारे निवेदन मराठा आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक गणेश गुजर यांनी केली.

Story img Loader