वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत किमान २० टीएमसी पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, तसेच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
एका कार्यक्रमानिमित्त क्षीरसागर येथे आले असता पत्रकारांनी जायकवाडी पाण्यासंदर्भात त्यांच्याकडे प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी ते बोलत होते. क्षीरसागर म्हणाले की, जायकवाडीची उभारणी मराठवाडय़ातील जनतेसाठी केली आहे. जायकवाडीवर औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आदी जिल्ह्य़ातील शेतीसिंचन अवलंबून आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे या जिल्ह्य़ांमधील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या ४ जिल्ह्य़ांतील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्याच वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणे आवश्यक झाले आहे. या शिवाय जायकवाडीच्या पाण्यावर परळी औष्णिक केंद्र, औरंगाबाद, जालन्याशिवाय अनेक लहान शहरे, तसेच मोठय़ा प्रमाणावर गावांचा पाणीपुरवठा जायकवाडीवर अवलंबून आहे. औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठाही प्रामुख्याने जायकवाडीवर अवलंबून आहे. जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे मराठवाडय़ातील जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचेही क्षीरसागर यांनी या वेळी सांगितले.

Story img Loader