संयुक्त महाराष्ट्रात विनाअट सामील झालेल्या मराठवाडय़ाला महाराष्ट्राने सामावून घेतले की नाही, की अजूनही निजामशाहीच सुरू आहे, असा संतप्त सवाल करून जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याची माहिती आमदार संजय जाधव यांनी दिली.
जायकवाडीच्या पाण्याचे समन्यायी पद्धतीने वाटप करावे, जिल्ह्यात कापूस पिकावर पडलेल्या लाल्या रोगाचे पंचनामे करून त्वरित अनुदान द्यावे, भारनियमन कमी करावे या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जायकवाडीच्या पाण्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री अन्याय करीत आहेत. त्यामुळे मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला आहे की नाही, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. संयुक्त महाराष्ट्रात विनाअट सामील झालेल्या मराठवाडय़ावर नेहमीच अन्याय केला जातो. हक्काचे पाणी असूनही पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी आपल्या राजकारणासाठी मराठवाडय़ात पाणी येऊ देत नाहीत. आताच जागरुक झालो नाही, तर मराठवाडय़ाला कायमस्वरुपी जायकवाडीच्या पाण्यास मुकावे लागेल, अशी भीतीही आमदार जाधव यांनी या वेळी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, अजित वरपुडकर, महिला आघाडीच्या संघटक सखुबाई लटपटे, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, पंढरीनाथ घुले यांची भाषणे झाली. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. मोठा पोलीस बंदोबस्त होता.

Story img Loader