कोल्हापूर महानगरपालिकेच्या ३८ व्या महापौरपदी जयश्री हरिदास सोनवणे यांची तर ३६ व्या उपमहापौरपदी सचिन आनंदराव खेडकर यांची आज निवड झाली. प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज हे ह्य़ा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
गतवर्षी कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. निकालानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन सत्ता स्थापण्याचा निर्णय केला. त्यानुसार महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे विभागून घेण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या वर्षी राष्ट्रवादीच्या कादंबरी कवाळे या महापौर तर काँग्रेसचे दिगंबर फराकटे हे उपमहापौर म्हणून निवडले गेले होते. या दोघांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर कामगार मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के.पी.पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह दोन्ही पक्षातील प्रमुखांची बैठक झाली. त्यामध्ये महापौरपदासाठी जयश्री सोनवणे व उपमहापौरपदासाठी सचिन खेडकर यांची निवड करण्याचा निर्णय झाला होता.
उपमहापौरपदासाठी सचिन खेडकर व राजू हुंबे या २ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी राजू हुंबे यांनी माघार घेतल्याने सचिन खेडकर यांचा एकच अर्ज राहिल्याने त्यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केले. नूतन उपमहापौर सचिन खेडकर हे प्रभाग क्र.२४ लक्षतीर्थ वसाहत या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
प्रभारी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, उपायुक्त संजय हेरवाडे व अश्विनी वाघमळे यांनी नूतन महापौर व उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या निवडीनंतर नगरसेवक, नगरसेविका यांनी नूतन महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन केले. दरम्यान या निवडीनंतर महापौर जयश्री सोनवणे व उपमहापौर सचिन खेडकर यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. फुलांनी सुशोभित केलेल्या वाहनांतून मिरवणुकीला प्रारंभ झाला. वाहनांवर हाताचे चिन्ह असलेले तिरंगे ध्वज तसेच हाताचे मोठे कटआऊट लावण्यात आले होते. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत ही सवाद्य मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून नेण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाचा जयघोष करीत मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनवणे व उपमहापौरपदी सचिन खेडकर यांची निवड झाल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आप्पासाहेब धुळाज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा