मुंबई महापालिकेने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडांबरोबरच आता जीवखडाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्यांना जीवखडय़ासाठी करावी लागणार वणवण थंबणार आहे.
हिंदू धर्मामध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जीवखडय़ाची (छोटय़ा दगड) आवश्यकता भासते. हा जीवखडा दिवसकार्य पूर्ण होईपर्यंत घराबाहेर बांधून ठेवतात. पार्थिव स्मशानभूमीत आणल्यानंतर प्रवेशद्वारातच जीवखडय़ाचा शोध होतो. अनेक वेळा तो सापडत नाही. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना छोटा दगडाची शोधाशोध करावी लागते.
स्मशानात पालिकेने जीवखडा उपलब्ध करून दिल्यास मृताच्या नातेवाईकांना त्याच्यासाठी करावी लागणारी शोधाशोध थांबेल आणि अंत्यसंस्कारासाठी विलंब होणार नाही. त्यामुळे पालिकेनेच स्मशानभूमीत जीवखडा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमाकात रहाटे यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन सर्व स्मशानांमध्ये जीवखडा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. स्मशानभूमीतील मृत्यू नोंदणी कारकुनांना परिपत्रक पाठवून तेथे जीवखडा उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्मशानात जीवखडय़ासाठी होणारी वणवण संपणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा