शिर्डी येथील एका विवाह समारंभातून १८ लाख ९० हजार रुपये किमतीचे ६३ तोळे सोन्याचे दागिने चोरटय़ाने लांबविल्याने खळबळ उडाली. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
शिर्डी येथे मेघा धर्मशाळेसमोरच्या प्रांगणात जैन समाजातील विवाह समारंभ होता. फिर्यादी मंगला कांतीलाल लोढा (वय ५८, रा. शिर्डी) यांच्यासह त्यांच्या दोन नातेवाईक महिलांनी ६३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिक पिशवीत घालून ते छोटय़ा बॅग मध्ये ठेवले होते. मंगला लोढा यांच्यासमोर लहान मुलगा पडल्याने त्यांनी आपल्या हातातील दागिन्याची बॅग जवळच्या सोफ्यावर ठेवली. त्याच दरम्यान एका चोरटय़ाने ती बॅग लांबवली. श्रीमती लोढा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल के ला आहे. चोरलेल्या दागिन्यांमध्ये नववधूच्या दागिन्यांचाही त्यामध्ये समावेश असल्याची चर्चा होती. याबाबत पोलीस निरीक्षक संपत भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या चोरीबाबतच संशय व्यक्त केला. लग्नसमारंभात गर्दी असतानाही सोन्याचा ऐवज चोरणा-या चोरटय़ाला पळताना कोणीच कसे पाहिले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले. परंतु तक्रारीप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला असे त्यांनी सांगितले.