मोटार सायकलवरुन प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा पाठलाग करुन मोटारसायकलवरूनच आलेल्या दोन चोरटय़ांनी पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सहा तोळयाचे दागिने सिनेस्टाईल पळवून नेले. लोणी गावात चित्रालय चौकात आज भरदुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.लोणी येथील हॉटेल व्यवसायिक सोमनाथ रक्ताटे व त्यांची पत्नी दिपिका हे मोटार सायकलवरुन लोणी-बाभळेश्व्र रोडवर जाताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पल्सर मोटार सायकलवरील दोन अज्ञात इसमांनी मागील सिटवर बसलेल्या दिपीका यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण व दोन तोळे सोन्याचे लॉकेट असा दिड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ओरबाडून धूम स्टाईलने पलायन केले. याबाबत लोणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लोणीतील बाळासाहेब राऊत यांचा अज्ञात इसमांनी खून केला. या घटनेला दोन-तीन महिने होवूनही यातील गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना अपयश येत आहे. तसेच घर फोडय़ा, चोऱ्या, धुमस्टाईलने दागिने ओरबाडने या घटना सातत्त्याने वाढत असून या घटनांनाही पायबंद घालण्यास लोणी पोलिसांना यश येत नाही.