गेल्या अनेक वर्षांपासून थकित रकमेसाठी लढा देणाऱ्या दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगार आता आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात डेरा आंदोलन करणार आहेत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा जिजामाता साखर कामगार संघटना सीटूने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
यासंदर्भात संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे अनेक कामगार आपल्या थकित रकमेसाठी शासन व प्रशासन स्तरावर आंदोलने करीत आहेत. मात्र, आजवर प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. या रकमेसाठी लढता लढता अनेक कामगारांनी आपले डोळे मिटले, तर अनेक कामगार देशोधडीला लागले. आज अनेक कामगारांच्या विधवा अतिशय कठीण दिवस जगत आहेत. सिटूप्रणित कामगार संघटनेने आजवर शासन व प्रशासनाशी कडवा संघर्ष केलेला आहे. प्रसंगी उच्च न्यायालयातही धाव घेऊन कामगारांचा लढा सुरू ठेवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात असलेली व साखर विक्रीतून येणारी रक्कम तातडीने कामगारांना वाटप करावी व कामगारांना दिलासा द्यावा, असा उच्च न्यायालयानेही आदेश दिलेला आहे. मात्र, तरीही प्रशासनाने राजकीय दबावला बळी पडून आजवर कामगारांना थकित रकमेचे वाटप केलेले नाही. हा सरळ सरळ प्रशासनाने न्यायालयाचा अवमान केला आहे.
मात्र, आता कामगारांचा संयम सुटत चालला असून, आता प्रशासनाशी निर्णायक लढा देण्याच्या मनस्थितीत कामगार आलेले आहेत. त्यामुळेच विजयादशमीपर्यंत थकित रकमेचे कामगारांना वाटप करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच कामगार डेरा आंदोलन करतील, असा इशारा जिजामाता साखर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.राजन चौधरी, कॉ.तुकाराम साळवे, कारभारी काळे, उत्तम जाधव, गुलाब पवार, शेख उमर, जगन जाधव, नुरखॉ पठाण, शेख कौसर, सुमन देशमुख, साबिरा पठाण, सखु सानप, राधिका गायकवाड यांनी या निवेदनातून दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा