महिला बचत गटाची स्थापना व व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय पद्धतीने करून स्वत:च्या उत्पादनासाठी एक ब्रँडनेम तयार करणाऱ्या जिजाऊ मार्केटिंगचे कार्य खरोखरीच कौतुकास पात्र आहे, असे प्रतिपादन येथील एमईटी संस्थेच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांनी केले.
नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था व जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने ‘जिजाऊ मार्केटिंग’ या खास बचत गटांसाठी उभारलेल्या दिवाळी बाजाराचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे उद्घाटन शेफाली भुजबळ यांच्या हस्ते गोविंदनगर येथील विघ्नहर्ता उद्यानाशेजारी झाले.
या प्रसंगी महापालिका आयुक्त संजय खंदारे, जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे, अॅड. रवींद्र पगार, नाना महाले, सोफिन मेनन आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांनी उपक्रमांची माहिती व बचत गटाच्या सत्कार सोहळ्याची भूमिका मांडली. आयुक्त खंदारे यांनी बचत गटाच्या या चळवळीत नाशिक मनपा सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
बाजीराव शिंदे यांनी सहकार खात्याकडून बचत गटाला कमी व्याजदरात अर्थसहाय्य करण्याविषयी व सहकार प्रशिक्षण केंद्राद्वारे गुणात्मक प्रशिक्षण देण्यासाठी सूचना निश्चितपणाने करू, असे सांगितले. अॅड. पगार, नाना महाले यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात अनुक्रमे दुसऱ्या मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या अन्नपूर्णा, जयहिंद, मयूरेश, चेतना, मल्हारबाबा, अंजली, सुरभी, अंजलीसूत हे बचत गट तसेच ब वर्ग श्रेणीतील बचत गट श्लोक, स्नेहवर्धिनी, श्रीसिद्धी, विनायक, अन्नपूर्णा जयश्रीराम, रेणुका, एकदंत, गायत्री देवी, गौतमी, माता गौतमी या बचत गटांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. दिवाळीचे फराळ व आणखी काही वैशिष्टय़पूर्ण उत्पादने या प्रदर्शनास असून त्यांचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा