कळवा रुग्णालयाचा ‘पांढरा हत्ती’ पोसणे आता कठीण असल्याचे सांगत हे रुग्णालय शासनाकडे वर्ग करण्याचा ठाणे महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव यापूर्वीच वादात सापडला असताना नव्यानेच मंत्रिपदावर आरुढ झालेले जितेंद्र आव्हाडांनी ठाणे महापालिका परिवहन उपक्रमही (टीएमटी) ‘बेस्ट’कडे सोपवावा, असा नवा गुगली टाकल्याने शिवसेनेच्या वर्मावर आता ‘टीएमटी’चा घाव बसला आहे. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ ठाण्यावर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या काळात शहराच्या नियोजनाचा बोऱ्या वाजल्याची टीका विरोधक करत असताना कळवा रुग्णालयाचा भार पेलवत नसल्याची कबुली खुद्द आयुक्तांनी दिल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे. असे असताना शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचा आणि तितकाच प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ‘टीएमटी’च्या नाकर्तेपणाची नव्याने चर्चा सुरू करत आव्हाडांनी शिवसेना नेत्यांची कोंडी केली आहे.
कळवा रुग्णालयाचा कारभार गेली अनेक वर्षे रडतखडत सुरू आहे. नव्वदच्या दशकात सत्ताधारी शिवसेनेलाच हे रुग्णालय नकोसे झाले होते. त्यानंतर मात्र येथील राजकीय नेत्यांनी रुग्णालयाला आपला राजकीय अड्डा बनविला. प्रभागातील रुग्णांची ‘सोय’ लावण्यासाठी कळवा रुग्णालय सोयीचे ठिकाण बनू लागले. त्यामुळे सुरुवातीला रुग्णालय नको, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेना नेत्यांनी हा विषय आता प्रतिष्ठेचा बनवला आहे. गेल्या अनेक वर्षांत कळवा रुग्णालयावर कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आर. ए. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यासाठी सुसज्ज असे अतिदक्षता कक्षही बनविण्यात आले. प्रत्यक्षात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे हा कक्ष अजूनही पूर्ण भराने सुरू झालेला नाही. या पाश्र्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी येताच आयुक्त असिम गुप्ता यांनी कळवा रुग्णालय नको, असा सूर आवळण्यास सुरुवात केल्याने हा निव्वळ योगायोग नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा