वेंगुल्र्याहून मुंबईत दाखल झालेला १३ वर्षांचा एक मुलगा कालांतराने काव्याच्या प्रांतात स्वतंत्र स्थान निर्माण करतो, रसिकमनावर अधिराज्य गाजवितो आणि महाराष्ट्र भूषणही ठरतो.. मंगेश पाडगावकर! पाडगावकरांचा हा जीवनपट उलगडून दाखविणारी डीव्हीडी लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. सांगली येथील चैतन्य मल्टिमीडियाने या डीव्हीडीची निर्मिती केली असून पाडगावकरांच्या प्रमुख उपस्थितीत ती लवकरच प्रकाशित केली जाणार आहे.
मराठी जनमानसावर गेली सहा दशके अलौकिक प्रतिभेची मोहोर उमटविणाऱ्या या कवीचे चाहत्यांशी अनौपचारिक नाते असल्याने त्यांच्याविषयी जाणून घेणे रसिकांना नेहमीच आवडत आले आहे. काव्यवाचनाची विशिष्ट शैली आणि गप्पांचा फड जमविण्याची आवड असल्याने पाडगावकरांनी आजवर शेकडो मैफली जिंकल्या आहेत. त्या माध्यमातून हा कविराज रसिकांपर्यंत पोहोचला आहेच मात्र त्यांचा हा आविष्कार काळाच्या ओघात हरवू नये या हेतूने सांगलीतील डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांनी या डीव्हीडीचे शिवधनुष्य उचलले. याकामी त्यांना पाडगावकरांचे जुने स्नेही बंडोपंत सोहोनी यांचे सहकार्य लाभले. प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे यांनी कविवर्याची प्रदीर्घ मुलाखत घेतली असून हे ध्वनिचित्रमुद्रण नुकतेच पूर्ण झाले. या डीव्हीडीमध्ये पाडगावकरांच्या कारकिर्दीचा आलेख, सुहृदांविषयीच्या आठवणी-किस्से-अनुभव या साऱ्याचा समुच्चय झाला आहे.
वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईत आल्यानंतर ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांच्याशी भेट झाली आणि ‘हा मुलगा पुढे मोठा कवी म्हणून नावारूपाला येईल’ असे भाकीत बोरकर यांनी केल्याची आठवण पाडगावकर यांनी यात जागवली आहे. कुसुमाग्रज हे दैवत असल्याने आपला ‘जिप्सी’ हा काव्यसंग्रह त्यांना आवडल्याने आपणास किती आनंद झाला व त्यांच्या कौतुकाने आपण कसे मोहोरून गेलो याचे मनोज्ञ वर्णनही त्यांनी केले आहे. शाळा-महाविद्यालय-विद्यापीठ अशा सर्व परीक्षांमध्ये ते कसे ‘टॉपर’ ठरले, त्यानंतर केलेली प्राध्यापकी, आकाशवाणीतील नोकरी, त्या दरम्यान अनेक दिग्गजांशी झालेली मैत्री या साऱ्या आठवणींचा खजिना पाडगावकरांनी मनमोकळेपणी उघडला आहे.
कुमार गंधर्वाचा एक अविस्मरणीय किस्साही त्यांनी यात सांगितला आहे. कुमारांच्या एका मैफलीला केवळ १२-१५ श्रोते उपस्थित होते. आपण त्यांना कार्यक्रम संपल्यावर भेटलो व त्याविषयी खंत व्यक्त केली. त्यावर कुमार गंधर्व म्हणाले, ‘अरे मी बाहेर बघून थोडंच गातो, मी तर आत पाहून गातो!’ त्यांचे हे उद्गार ऐकून मी चमकलो व त्यातून मला फार मोठा संदेश मिळाला. कलाकारांनी किंवा कोणीही सुखाच्या मागे धावण्यापेक्षा समाधानी वृत्तीने जगायला हवे, तसे जगल्यास अनेक प्रश्न सुटतात, आतला आवाज काय सांगतो ते महत्त्वाचे असते. या प्रकारचे त्यांचे चिंतनही या डीव्हीडीमध्ये पाहायला मिळते. पाडगावकर यांच्या समस्त चाहत्यांसाठी तसेच काव्याच्या प्रांतात मुशाफिरी करू पाहणाऱ्या होतकरूंसाठी ही डीव्हीडी पर्वणीची ठरेल यात शंका नाही.     

हौसेला मोल नाही
व्यवसायाने दंतचिकित्सक असणाऱ्या डॉ. चैतन्य यांनी केवळ शब्द-सुरांवरील प्रेमापोटी  डीव्हीडीचा घाट घातला आहे. काहीतरी उत्तम आणि वेगळं रसिकांपर्यंत पोहोचावं या हेतूने कोणताही व्यावसायिक लाभ नजरेसमोर न ठेवता उलटपक्षी पदरमोड करूनच त्यांनी चैतन्य मल्टिमीडियाची स्थापना केली आहे. ‘रियाज’ या शीर्षकांतर्गत त्यांनी आजवर ११ डीव्हीडींची निर्मिती केली आहे. तबला, पखवाज तसेच नृत्याच्या सरावासाठी उपयुक्त ठरतील अशा ‘लेहरा-नगमा’ या त्यांच्या डीव्हीडी अनोख्या ठरल्या आहेत. यामुळे हार्मोनियम अथवा व्हायोलिन वादकाशिवाय तालवादकांना आणि नर्तकांना सराव करणे शक्य झाले आहे. ज्येष्ठ सतारवादक पं. शंकर अभ्यंकर यांनी रचलेल्या तब्बल ६० बंदिशींची डीव्हीडीही चैतन्य यांनी यापूर्वीच रसिकांपुढे सादर केली आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जीवनपट चित्रबद्ध करण्याची कल्पना सुचणे व ती प्रत्यक्षात उतरणे यासारखे भाग्य नाही, अशी भावना डॉ. चैतन्य व्यक्त करतात.

Story img Loader