बहुचर्चित जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडाच्या वाटपाचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात जेएनपीटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते पत्र घेणाऱ्या सावरखार येथील बाळकृष्ण गोविंद घरत या शेतकऱ्याने पत्र वाटपाच्या तीन महिन्यांनंतरही आपल्याला भूखंडाचा ताबा मिळालेला नसताना गावाच्या शेजारी सुरू असलेला सेझचे मातीच्या भरावाचे काम कसे सुरू केले, असा सवाल करीत काम बंद करून मंगळवारी सकाळी अचनाकपणे ग्रामस्थांच्या उपस्थितीत उपोषण सुरू केले आहे. जेएनपीटीने पंतप्रधानांच्या हस्ते पत्र देऊन आपली फसवणूक केल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडासाठी असंख्य लढे झाल्यानंतर अखेरीस केंद्र सरकार आणि जेएनपीटीने साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार राज्य सरकारकडे जेएनपीटीने १११ हेक्टर जमीन हस्तांतरितही केली. मात्र ही जमीन लाभधारक शेतकऱ्यांना वाटप करायच्या जमिनीपेक्षा ३५ हेक्टरने कमी असल्याने दोन वर्षे प्रश्न प्रलंबित राहिला होता. दरम्यान केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते जंगी कार्यक्रमाचे आयोजन करून जेएनपीटीच्या पाच प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्केचे पत्र देण्याचा कार्यक्रम राबविला. यामुळे जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांमध्येही आनंद पसरला होता. मात्र प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या पत्रात कुठेही जमिनीचे वर्णन नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या बंदरावर आधारित सेझच्या भरावाला सोमवारी सुरुवात झाल्याचे सावरखार व सोनारी येथील शेतकऱ्यांना समजताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भरावाचे काम बंद पाडून त्याच ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी प्रथम जेएनपीटी साडेबारा टक्केच्या भूखंडाचे वाटप करा नंतरच कामाला सुरुवात करा, अशी भूमिका येथील ग्रामस्थांची असल्याची माहिती सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पाटील यांनी दिली आहे.
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंडासाठी शेतकऱ्याचे उपोषण
बहुचर्चित जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडाच्या वाटपाचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात जेएनपीटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता.
First published on: 29-10-2014 at 07:18 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnpt framers hunger strike