नाशिक महापौरपदासाठी आकारास आलेली काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे ही युती अभद्र व तात्पुरती तसेच नीतिमूल्य न जपणारी असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली. पीआरपी शहर शाखेतर्फे आयोजित रिपब्लिकन जनशक्ती मेळाव्यासाठी गुरुवारी आ. कवाडे हे येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी नाशिक महापालिकेतील नव्या सत्ता समीकरणावर बोट ठेवले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेस समवेत विधानसभा निवडणुकीत राज्यात २७ जागा लढविणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील देवळाली व भुसावळ या दोन मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले. जनतेने भरभरून विश्वास व्यक्त केलेल्या मोदी सरकारने अवघ्या शंभर दिवसात सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग आणि भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे मोदींची लाट ओसरत असून त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार भ्रष्टाचाराला लगाम, परदेशातील काळा पैसा भारतात आणणे आणि महागाईच्या मुद्दय़ावर १०० दिवसांत काही करू शकले नाही. विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात २७ जागा लढविणार आहे. पक्षाची काँग्रेसबरोबर असलेली युती यापुढेही कायम राहील.
विधानसभा निवडणुकीसाठी चार-पाच जागा पक्षाने देण्याचे मान्य केले आहे. आपली युती काँग्रेसशी आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्यास आम्ही मित्रपक्ष आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीने आम्हालाही काही जागा सोडणे आवश्यक आहे.
काँग्रेसने आमच्यासोबत जागावाटपाबाबत बोलणी करावी. आम्ही आघाडीचे घटक पक्ष आहोत, हे खुलेपणे जाहीर करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान प्रा. कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन जनशक्ती सत्कार मेळाव्यात पक्षाच्या आगामी विधानसभा निवडणुकीबाबतच्या धोरणावर साधक-बाधक चर्चा झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा