नागपूरचे जोगेंद्र कवाडे व प्रकाश गजभिये या दोन दलित नेत्यांच्या गर्जना आता विधान परिषदेत ऐकायला मिळतील. आगामी विधानसभा निवडणूक पाहता दलित मतांवर डोळा ठेवून काँग्रेसने नागपुरातून पीरिपाचे संस्थापक प्रमुख जोगेंद्र कवाडे तर प्रकाश गजभिये यांना राष्ट्रवादी काँग्रेसने  विधान परिषदेचे सदस्यत्व बहाल केले आहे.
कवाडे सर म्हणून प्रख्यात, ऐतिहासिक लाँगमार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीमुळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीमध्ये जोगेंद्र कवाडे यांनी पदोपदी येणाऱ्या संकटांचे व अडचणीचे निखारे पायाखाली तुडवित संघर्ष हाच अभ्युदयाचा महामंत्र मानला. सामाजिक परिवर्तनाच्या काटेरी ध्येयमार्गावर त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली. आंबेडकरवादी सामाजिक चळवळ व कट्टर आंबेडकरवाद्यांमध्ये कवाडे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक होते. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या सवलतीसाठी आंदोलन केले. त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावास झाला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांनी हजारो भीमसैनिकांना घेऊन औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला. त्यांच्या प्रखर आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले.
१९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. सळसळत्या, बाणेदार व वादळी व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले जोगेंद्र कवाडे यांचा जीवनपट म्हणजे त्यांच्या कार्यक्षम व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाची साक्ष आहे. ते विद्यार्थीप्रिय आहेतच. तत्त्वांसाठी तडजोड न करणारे परंतु राजकीय विचारांपलीकडे जाऊन मैत्र जोपासणारे व्यक्तिमत्त्व अशीही त्यांची ख्याती आहे.
प्रा. कवाडे माजी खासदार आहेत. १९९८ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून रिपाइंच्या तिकिटावर निवडून आले होते. विधान परिषदेचे ते याआधीही सदस्य होते.
दरम्यान, नागपूरचे जोगेंद्र कवाडे व प्रकाश गजभिये या दोन दलित नेत्यांच्या गर्जना आता विधान परिषदेत ऐकायला मिळतील.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कवाडे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड म्हणून त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व काँग्रेसने बहाल केले, हे स्पष्ट आहे.
मुळात रामदास आठवले आधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. प्रकाश गजभिये हे आठवलेंचे चाहते. कालांतराने आठवले पवारांपासून दूर गेले आणि महायुतीत सामील झाले. प्रकाश गजभिये यांनी रीतसर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आणि पवारांनी त्यांना विधान परिषदेवर घेतले.
लोकसभा निवडणुकीत गवई राष्ट्रवादीपासून दूर झाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला.
आता विधानसभा निवडणुकीत नामुष्की वाचविण्याच्या प्रयत्नात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यासाठी काँग्रेसने कवाडे तर राष्ट्रवादी काँग्रेसने गजभियेंना विधान परिषदेवर नियुक्ती देत दलित मतांवर डोळा ठेवला आहे, असे राजकीय क्षेत्रात बोलले जाते.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निश्चितच चांगले दिवस येतील, अशी प्रतिक्रिया जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. या नियुक्तीने आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने दिलेले अभिवचन पूर्ण केले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह सर्व काँग्रेसजनांप्रति त्यांनी आभार व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा