शहरातील रामवाडी तसेच अन्य वसाहती राज्य सरकारच्या नियमानुसार अधिकृतपणे झोपडपट्टी घोषित व्हाव्यात यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांना अखेर यश आले असून यासंदर्भात ३ एप्रिलला राज्य सरकारच्या सुचनेनुसार मनपा व सर्व संबधितांची बैठक मनपा कार्यालयात होत आहे.
रामवाडी, गोकूळवाडी, कॅम्प कौलारू व कोठला या ४ वसाहतींचा यात प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे. या चारही वसाहती मनपा हद्दीत असल्या तरी ती जागा भिंगार छावणी मंडळाची आहे. त्यामुळे छावणी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, नगररचनाकार विश्वनाथ दहे हेही या बैठकीला उपस्थित असतील. राज्य सरकारने ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून मनपाची नियुक्ती केली आहे.
शहरातील एकूण २३ वसाहतींना महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधार, निर्मूलन व पुर्नविकास कायद्यातंर्गत झोपडपट्टी म्हणून घोषित करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने सन २००७ मध्ये मान्यता दिली आहे. मात्र त्या संदर्भात पुढे काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे झोपडपट्टी विकास साठी राज्याकडून येणारा निधी या वसाहतींमध्ये खर्च करता येत नव्हता. म्हणून उडाणशिवे या वसाहतींमधील रहिवाशांना एकत्र करून त्यांच्या माध्यमातून सतत प्रयत्न करत होते. त्याला यश आले असून आता या बैठकीनंतर शहरातील किमान या चार वसाहती तरी झोपडपट्टी म्हणून अधिकृतपणे घोषित होतील व तेथील विकासकामांसाठी राज्याचा निधी वापरता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा