प्रत्येक टप्प्यावर पत्रकारिता बदलत गेली आहे. पत्रकारिता करताना जो तारेवरची कसरत करतो तोच कसरतपटू ठरतो. ते कौशल्य आहे म्हणून समाज त्याला स्वीकारतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांनी केले.
येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकार दिन रविवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव कोल्हे होते. तालुक्यातील पत्रकारांचा यावेळी गौरव करण्यात आला.
प्रारंभी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. ए. जी. ठाकूर, प्राचार्य आर. ए. कापगते, उपप्राचार्य संजय आरोटे, प्राचार्य डी. एन. क्यातनवार, प्रबंधक व्ही. बी. शेळके, के. एम. भावसार, संजीवनी कारखान्यांचे संचालक बाळासाहेब वक्ते, प्रभा कुलकर्णी, पत्रकार उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाले, पत्रकारितेत आता स्पेशलायझेशनचा जमाना आला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाने फेसबुक, इंटरनेट, सोशल जर्नालिझमची व्याप्ती वाढत आहे. जेथे जोखीम असेल तोच व्यवसाय बहरला जातो; तेच तत्त्व पत्रकारितेतही आहे. मात्र मूळ तत्त्व बदललेली नाहीत. शब्दांची जडणघडण करणाऱ्यांकडे शोधक बुद्धी गरजेची असते. पत्रकारांनी बातमी लिहिताना चार शब्द नवीन तयार केले पाहिजेत. ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांमध्ये अभ्यासाचा अभाव आहे.
सचिव अंबादास अत्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.