पत्रकारिता जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारी असावी. त्यातून जनसामान्य नाउमेद न होता उत्साही बनावेत. या कामातून भविष्याचा वेध घेत नव्या पिढीतील पत्रकारांनी लेखणी चालवावी, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या नूतन कार्यालयाच्या वास्तूचा उद्घाटन सोहळा शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संयुक्त हस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासह खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार भारत भालके, आमदार दीपक साळुंखे, महापौर अलका राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी आदींची उपस्थिती होती. संघाचे अध्यक्ष मनीष केत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मराठी पत्रकारितेला बाळशास्त्री जांभेकरांपासूनची मोठी परंपरा असून सोलापुरता बाबुराव जक्कल यांच्यासारखे आदर्श संपादक होऊन गेले. रंगाअण्णा वैद्य यांनी लिहिलेला अग्रलेख वाचलाच पाहिजे अशी भावना दृढ होत होती. सोलापूर शहर व जिल्ह्य़ाच्या विकासाचे प्रश्न येथील पत्रकारितेने सातत्याने मांडले, अशा शब्दात सोलापूरच्या पत्रकारितेचा गौरव करीत पवार यानी सध्याच्या पत्रकारितेच्या पद्धतीबद्दल चिमटेही काढले. ते म्हणाले, १९७२ साली याच सोलापूर जिल्ह्य़ात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा एकाच वेळी पाच लाख लोक रोजगार हमी योजनेच्या कामावर होते. तर आजच्या दुष्काळी संकटात रोहयोवर केवळ आठ हजार मजूर काम करीत असल्याचे दिसून येते. हा बदल विचार करण्यासारखा आहे. उजनी धरणे सोलापूरसाठी भाग्यरेषा ठरली असून या धरणात पाणी नसते. हा अनेक वर्षांचा इतिहास असूनही या धरणाने कधी धोका दिला नाही. सद्य:स्थितीत उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी होते. उजनीच्या वरच्या बाजूला धरणे झाली आहेत. उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन अगोदरच झाले असून यात अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी अद्याप पाण्याच्या नियोजनाची दिशा पूर्ण झाली नाही. जिल्ह्य़ात फळफळावळांचे क्षेत्र वाढले असून येथून बोर, द्राक्षे, डाळिंब निर्यात होतात. डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर संशोधन होण्यासाठी ३०-३५ शास्त्रज्ञ कामाला लागण्यासाठी सोलापुरात डाळिंब संशोधन केंद्र आपल्याच पुढाकाराने सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्य़ासाठी आपण काहीच केले नाही, असा जो प्रचार होत आहे, त्याबद्दल पवार यांनी नाराजीचा सूर लावत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पाणी प्रश्नावर जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ांमध्ये वाद होत असून तो टाळला पाहिजे. समाजकारण व राजकारणात मतभेद असतात, परंतु शेवटी राजकारण्यांना ज्यांनी प्रतिष्ठा दिली, त्या सामान्यजनांचे भले करण्यासाठी सत्तेचा वापर केला पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
या वेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार व आपल्यात कधीही मतभेद नव्हते आणि नाहीत. ते आपले ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. मतभेदाचे जे विषय रंगविले गेले ते प्रसारमाध्यमांनीच. सोलापुरातील आपल्यासारखा एक अतिशय छोटा माणूस राजकारणात एवढय़ा उच्च पदावर पोहोचला, तो केवळ शरद पवारांनी दिलेल्या धडय़ामुळेच. त्यांचा धडा आजही गिरवितो आणि कृतीही करतो, असा निर्वाळा दिला.
अध्यक्षीय भाषणात विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मराठी पत्रकार संघाने सोलापुरात देखणी वास्तू उभारल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सोलापूरच्या पत्रकारांचा नियोजित गृहनिर्माण प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आपण सुरुवातीला प्रयत्न केले. तो अद्याप प्रलंबित आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना कराव्यात, अशी अपेक्षा मोहिते-पाटील यांनी केली. या वेळी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासह राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जोशी आदींची भाषणे झाली. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. तर नितीन पात्रे यांनी आभार मानले.
सामान्यांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता असावी – पवार
पत्रकारिता जनसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारी असावी. त्यातून जनसामान्य नाउमेद न होता उत्साही बनावेत, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
First published on: 07-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalism should be for common people pawar