राष्ट्रीय पत्रकारदिनी आयोजित चर्चासत्रात जिल्ह्य़ातील समस्यांवर शासनाचे लक्ष वेधताना पत्रकारांनी माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली.
जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त जिल्हाधिकारी नवीन सोना होते. शंभरावर वार्ताहर, पत्रकार, वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या लक्षणीय उपस्थितीत संपन्न या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांचे स्वातंत्र्य या विषयावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रसिद्धीमाध्यम विभागप्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी प्रामुख्याने विचार मांडले. जिल्हाधिकारी नवीन सोना म्हणाले, माहितीचे आदानप्रदान तत्परतेने करण्याचा प्रयत्न आहे. विकासकार्यात पत्रकारांची भूमिका मोठी आहे. सामान्य जनतेचे प्रश्न मांडून प्रशासनाचे त्यावर लक्ष वेधण्याचे काम हा घटक करतो. शिक्षण, आरोग्य, महसुली समस्या याविषयी माध्यमांचे आपण नेहमी सहकार्य घेऊ.मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद चोरडिया व प्रकाश कथले यांचा सत्कार करण्यात आला. मराठी पत्रकार संघाचे अनिल मेघे, श्रमिक संघाचे प्रवीण धोपटे, संपादक संघाचे दिलीप जैन व राजू गोरडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत व उपजिल्हाधिकारी मेश्राम यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर व सहाय्यक मिलिंद आवळे यांनी संचालन केले. आनंद शुक्ला यांनी आभार मानले

Story img Loader