आजच्या काळात मोठय़ाने विस्तारत जाणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात पत्रकारांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करून ज्या गोष्टी लोकांसमोर येणे आवश्यक आहे त्यांनाच महत्त्व द्यायला हवे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी ठाणे येथे केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कमी होतेय का?’ या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. श्रीरंग विद्यालयाच्या पटांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी कुबेर यांनी त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील प्रवासाची माहिती सांगितली. तसेच त्यांचे पत्रकारितेतील आदर्श आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. पत्रकाराने कायम लिखाणातून दिसायला हवे, असेही त्यांनी सांगितले. जे दडपण्याचा प्रयत्न होतोय ते समोर आणण्यातच खरी पत्रकारिता आहे, असेही त्यांनी सांगितले. आजच्या पत्रकारितेने मनोरंजनीकरणाचे पांघरूण घेतले असून यात मूळ पत्रकारिता बाजूला राहून गेली असल्याचे मत त्यांनी या वेळी मांडले. ‘जे जे उत्तम ते मांडावे’ या तत्त्वावर पत्रकारिता करणे आवश्यक आहे.
पत्रकाराने एखाद्या विषयावर लिखाण करताना ज्या गोष्टी लोकांसमोर मांडायला हव्यात त्या प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांत अभ्यासू वृत्ती असायला हवी, असेही त्यांनी सांगितले. आजची माध्यमे बरेच काही दाखवत असताना यातील किती गोष्टी खऱ्या आहेत हे पारखण्याची ताकद वाचकांमध्ये असायला हवी, असे त्यांनी सांगितले.
आजच्या काळात राहिलेल्या कामांचा खर्च झालेल्या कामांच्या खर्चापेक्षा अधिक असतो यावरही त्यांनी सडकून टीका केली. तसेच ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली काही पत्रकारांनी चालविलेल्या खंडणीच्या व्यवसायाचाही त्यांनी निषेध केला. या पाश्र्वभूमीवर अलीकडेच एका खासगी वृत्तवाहिनीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचेही त्यांनी समर्थन केले. लोकांना चांगल्या दर्जाच्या गोष्टी वाचायला देण्यानेच पत्रकारितेची विश्वासार्हता वाढेल. तसेच बातमी ही विश्लेषणपूर्ण असावी असेही मत त्यांनी या वेळी मांडले. या कार्यक्रमास मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती. उप-महापौर मिलींद पाटणकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी कुबेर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

Story img Loader