शहरी व गामीण पत्रकारिता असा फरक करता येणार नाही. समस्या सर्व ठिकाणीच असल्याने त्या मांडणे हे पत्रकारांचे काम आहे. पत्रकारांनी व्यवस्थेचा भाग न होता आपल्या लेखणीतून चांगल्या अर्थाने ओळख निर्माण करावी. पूर्वीही कडक शब्दात लिहिणारे पत्रकार होते. मात्र, अलीकडे माहितीचा उपयोग इतर कारणांसाठी होऊ लागल्याने पत्रकारांवर हल्ल्याचे प्रकार वाढत असल्याचे  ‘लोकसत्ता’चे मुख्य संपादक गिरीश कुबेर यांनी सांगितले.
परळी येथे मराठवाडा साथी कार्यालयात पत्रकार संघ व साहित्य शाखेच्या वतीने कुबेर यांच्याशी पत्रकारांनी वार्तालाप केला. यावेळी पत्रकार मोहनलाल बियाणी, आमदार प्रशात बंब आदी उपस्थित होते. स्थानिक पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना कुबेर म्हणाले, मराठवाडय़ात कै. अनंत भालेराव, रंगा वैद्य यांसारख्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून सामाजिक वलय निर्माण केले होते. भालेराव, वैद्य काय लिहितात याकडे मुंबईतील पत्रकारांचेच नव्हे तर सरकारचेही लक्ष असायचे. कडक शब्दांत लिहिणाऱ्या पत्रकारांची कमी नव्हती. सत्य हे सहन होत नसते, पण अलीकडे माहितीचा उपयोग इतर ठिकाणी इतर कारणासांठी होत असल्याने पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रकार वाढले असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
दूरचित्रवाहिन्यांवरून कोणत्याही घटनांचे केले जाणारे तत्काळ प्रक्षेपण, त्यासाठी जबाबदारीचे भान सोडून केला जाणारा केविलवाणा प्रयत्न ही चिंतेची बाब आहे. भूमिका सोडून पुढे गेले की त्याचे परिणाम होतात. प्रिंट माध्यमांमध्येही काही प्रमाणात अपप्रवृत्ती आहेत. माध्यमांमध्ये आजही चांगली माणसे आहेत, असे सांगून पत्रकारांनी व्यवस्थेचा भाग न होता स्वत:ची ओळख आपल्या लेखणीतून निर्माण केली पाहिजे. पत्रकारितेचे काही सार्वजनिक संकेत जपले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा