अलीकडच्या दहा वर्षांच्या काळात नवसाक्षरता वाढली असून, या नवसाक्षरवर्गाने मुद्रितमाध्यमांना तगवून ठेवले आहे. मात्र मुद्रितमाध्यमांतील पत्रकारांनी आपल्यासमोरील आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचविण्यापेक्षा व पायाभूत साचेबद्ध पत्रकारिता सोडून देत माहितीचे विश्लेषण करायला शिकले पाहिजे, अशी अपेक्षा ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व लोकमंगल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दि हेरिटेज गार्डन’ येथे आयोजित दोनदिवसीय पत्रकारांच्या कार्यशाळेचा समारोप संगोराम यांच्या व्याख्यानाने झाला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर हे अध्यक्षस्थानी होते. नवपत्रकार जर पत्रकारिता व्यवसायात विचारपूर्वक आले तर त्यांना या क्षेत्रात करण्यासारखे खूप काही आहे. परंतु सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात केवळ प्यादे म्हणून काम करीत असू तर आपला हेतू साध्य होणार नाही, असे नमूद करीत संगोराम म्हणाले, आव्हाने असली तरी त्यामुळे मुद्रितमाध्यमे बंद पडणार नाहीत. तर त्याचा मेंदू बंद पडण्याची भीती वाटते. इलेक्ट्रॉनिक्समाध्यमे येण्यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये पेड न्यूजसारखे प्रकार नव्हते. माध्यमांचा जनमानसावर बऱ्यापैकी दबाव होता. आता बदलत्या परिस्थितीत समाजावर माध्यमांचा परिणाम होतो काय, हा खरा प्रश्न आहे. पत्रकारितेची नोकरी आणि इतर कोणत्याही व्यवसायातील नोकरी यात फरक आहे. पत्रकारांना पत्रकारितेत नोकरी सांभाळताना एकीकडे वाचकांशी बांधिलकी ठेवायची आणि दुसरीकडे मालकाशीही संधान साधून राहायचे असते. निष्ठेने काम केले तर सर्व काही मिळते. मात्र लबाडी केली तर मिळालेले सुख हे तात्पुरते असते. त्यात समाधान नसते. पत्रकारांना एकाच वेळी वाचक व व्यवस्थापन यांच्या कोंडीतून जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांनी सदैव कुतूहल जागे ठेवले नाहीतर आपण काय करतो, हे कळणार नाही. सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून काम करीत असताना समाजात होणारे बदल डोळे उघडे ठेवून टिपता आले पाहिजेत, असे विचार त्यांनी मांडले.
या कार्यशाळेत सकाळच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी ‘मराठी पत्रकारिता आणि जागतिकीकरण’ या विषयाची मांडणी केली. ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांनी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले. तर ज्ञानेश महाराव (मुंबई) यांनी ‘पत्रकारिता कशासाठी?’ या विषयावर परखड विचार मांडताना समाजातील व पत्रकारितेतील ढोंगबाजीवर प्रहार केला. सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोळकर हे अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर ‘चिंतन ग्रुप’चे अभिनंदन थोरात यांनी ‘पत्रकारितेतील बदलते तंत्र’ या विषयावर मांडणी करताना नव्या बदलाचा वेध घेतला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कांबळे होते. ‘झी टीव्ही’चे अजित चव्हाण यांनी ‘वृत्तवाहिन्यांचा प्रभाव व त्याचे परिणाम’ या विषयावर संवाद साधला. जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी लोकमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार सुभाष देशमुख व श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर यांनी मनोगत मांडले. या वेळी कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विजयकुमार राजापुरे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेत शहर व जिल्हय़ातून सुमारे १४० पत्रकार सहभागी झाले होते.