मनसेने ८३ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नाशिक शहराची जम्बो नूतन कार्यकारिणी अखेर सोमवारी जाहीर केली. या यादीत काही निवडक जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवून अनेक नव्या पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रखडलेली कार्यकारिणी लांबलचकपणे जाहीर करताना कार्यकर्ते नाराज होणार नाही, याचीच दक्षता घेतली गेली.
तथापि, मनसेतील दोन आमदारांमध्ये धुमसणारा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. कारण, ही कार्यकारिणी जाहीर करताना ना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे आमदार उपस्थित होते, ना पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार. अशी काही कार्यकारिणी जाहीर झाल्याची माहितीच आपल्याला नसल्याची प्रतिक्रिया आ. नितीन भोसले यांनी व्यक्त केली.
मनसे आ. वसंत गिते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत राजगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही जम्बो यादी जाहीर करण्यात आली. मध्य विधानसभा निरीक्षक म्हणून अनील भालेराव, पूर्व विधानसभा निरीक्षक अनिल वाघ, पश्चिम विधानसभेच्या निरीक्षकपदाची धूरा सुरेश भंदुरे यांच्यावर सोपविली गेली आहे.
या शिवाय, विभागनिहाय सहा अध्यक्षांची नेमणूक करताना जुन्या चार पदाधिकाऱ्यांना डच्चू दिल्याचे दिसते. सहा शहर उपाध्यक्ष, १६ शहर सहचिटणीस, १८ संघटक, दोन पक्ष प्रवक्ते, १७ शहर चिटणीस, १४ शहर कार्यकारिणी सदस्य यांच्यासह कार्यालयीन प्रमुख पदाची जबाबदारी प्रदीप वझरे यांच्यावर सोपविली गेली आहे.
नूतन कार्यकारिणीत नव्या पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तथापि, यापूर्वी शहराध्यक्षपदाची जबाबदारी आ. नितीन भोसले सांभाळत होते. आ. गिते आणि आ. भोसले यांचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडून हे पद काढण्यासाठी प्रदीर्घ काळापासून एका गटाचे प्रयत्न सुरू होते. त्यात यश आल्यावर शहराध्यक्षपदाची धूरा समीर शेटय़े यांच्यावर सोपवून शहर कार्यकारिणीवर आपले वर्चस्व राहील याची तजविज एका गटाने केली.
सोमवारी जाहीर झालेल्या नूतन कार्यकारिणीतील जम्बो यादीवर नजर टाकल्यास त्याची सहजपणे प्रचिती येते असा सूर मनसेच्या गोटात उमटत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, घाऊक स्वरुपात पदांचे वितरण करतानाही मनसेतील दोन गटातील दुही प्रकर्षांने अधोरेखीत झाली. या संदर्भात मनसेचे माजी शहराध्यक्ष व विद्यमान आमदार नितीन भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल आपणास काहीच माहीत नसल्याचे सांगितले.
‘रायुकाँ’ची शहर कार्यकारिणी जाहीर
मनसेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ५१ जणांचा समावेश असलेली जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष छबू नागरे यांनी ही यादी जाहीर केली. या यादीतही घाऊक स्वरुपात पदांचे वाटप करण्यात आल्याचे दिसते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरासाठी १३ उपाध्यक्षांची नेमणूक केली आहे. या शिवाय, सरचिटणीस, चिटणीस व संघटक प्रत्येकी नऊ, तीन विधानसभा अध्यक्ष, प्रसिध्दी प्रमुख व खजिनदार प्रत्येकी एक तर सहा विभागीय अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनसेची जम्बो शहर कार्यकारिणी
मनसेने ८३ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नाशिक शहराची जम्बो नूतन कार्यकारिणी अखेर सोमवारी जाहीर केली.
First published on: 04-02-2014 at 08:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jumbo city work execution by mns