हिरवाईने नटलेला डोंगर, डोळ्याचे पारणे फेडावे असा नजारा, घनदाट जंगलातून जाणारा पायवाट, सोबतीला पक्ष्यांचा किलबिलाट आणि खळखळ वाहणारा धबधबा.. नवी मुंबईतील घणसोलीजवळ असलेल्या गवळीदेव पर्यटनस्थळाचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडावे, असा निसर्गसौंदर्य या परिसराला लाभला आहे. एका बाजूला औद्योगिक परिसर असल्याने या परिसरात कुठे धबधबा असेल याचा पत्ताही लागत नाही. पण हा डोंगर जसजसा वर चढत जातो, तसतशी येथील निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनराईचे दर्शन होत जाते. काहीसा डोंगर चढल्यानंतर समोर दिसतो उंच कडय़ावरून कोसळणारा फसफसता धबधबा, मग काय या धबधब्यात भिजण्याचा मोह तरुणाईला आवरत नाही.
पावसाळय़ात तरुणाईची पावले धबधब्यांकडे वळतात, पण या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना नागरी भाग सोडून शहापूर, मुरबाड, बदलापूर, कर्जत किंवा पनवेल या परिसरांतील हिरवाईने नटलेल्या परिसरात जावे लागते. पण ठाणे शहरापासून केवळ काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या घणसोली परिसरातही एक पावसाळी पर्यटन केंद्र आहे, याचा पत्ता काही थोडय़ा जणानांच आहे. नवी मुंबई परिसरातील तरुणाई दर सप्ताहअखेरीस या धबधब्याच्या ठिकाणी हजेरी लावते आणि मुसळधार पावसाचा आणि येथील दुधाळ धबधब्याचा मनसोक्त आनंद घेते.
घनसोली आणि रबाले यांमधील औद्योगिक पट्टय़ात असलेल्या डोंगरावर गवळीदेव धबधबा आहे. येथील स्थानिक देवतेवरून या परिसराचे नाव गवळीदेव पडले. रस्त्यावरून एक पायवाट या डोंगरावर जाते. घनदाट जंगल, दोन्ही बाजूला उंच उचं व डेरेदार वृक्ष आणि पक्ष्यांचा किलबिलाट त्यामुळे या पायवाटेने चालताना एक वेगळीच मजा येते. काही अंतरावर पाण्याचा धो धो असा आवाज ऐकू येतो.. त्या बाजूला गेलात, तर एक सुंदर निसर्गनजारा समोर दिसतो. उंच कडय़ावरून पाणी खाली कोसळते आणि खाली असणाऱ्या ओहोळातून हे पाणी पुढे जाते. या धबधब्याच्या ठिकाणी डोंगरात कपारी आहेत, तरुणाई त्यावर चढून धबधब्याचा आनंद घेतात, पण ते धोकादायक आहे. खाली ओहोळातही धबधब्याच्या कोसळणाऱ्या तुषारांसमवेत धबधबोत्सव साजरा करण्यात वेगळाच आनंद आहे.
धबधब्यात मनसोक्त भिजल्यानंतर याच पायवाटने आणखी पुढे चालायचे. ही जंगलवाट आपल्याला डोंगरावरती घेऊन जाते. पुढे गवळीदेवाचे देवस्थान लागते. येथे मंदिर नाही, तर केवळ मूर्ती आहे. समोर पुन्हा एक ओहोळ असून, त्यातही चिंब होण्याचा आनंद तरुणाई घेते. पुन्हा याच पायवाटने पुढे गेल्यास घनदाट जंगलात एक नैसर्गिक तळे लागते. या तळ्यात मनसोक्त डुंबायचे आणि पावसाचा आनंद घ्यायचा यासाठी तरुणाई तर आतुर असते.. या डोंगरावर आणि धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर येथून पावले खाली येण्यास तयारच नसतात.
जंगलवाट नि धो धो धबधबा..
हिरवाईने नटलेला डोंगर, डोळ्याचे पारणे फेडावे असा नजारा, घनदाट जंगलातून जाणारा पायवाट, सोबतीला पक्ष्यांचा किलबिलाट आणि खळखळ वाहणारा धबधबा..
![जंगलवाट नि धो धो धबधबा..](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2015/07/water-fall-copy1.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 02-07-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jungle root and water fall