लांब पल्ल्याच्या गाडीमध्ये चढताना पडून मृत्यू झालेल्या एका प्रवाशाच्या कुटुंबियांना अखेर आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. या प्रवाशाचा मृत्यू अपघाती नव्हे, तर त्याने आत्महत्या केल्याने झाल्याचा दावा करणाऱ्या मध्य रेल्वेचा दावा फेटाळून लावत उच्च न्यायालयाने या प्रवाशाच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊन मध्य रेल्वेला दणका दिला.
नागपूर-भुसावळ एक्स्प्रेसने प्रवास करताना भगवान वसाने या प्रवाशाने आत्महत्या केली नव्हती, तर त्याचा अपघाती मृत्यू झाला होता, यावर शिक्कामोर्तब करीत रेल्वे अपघात दावा लवादाने वसाने यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांनी लवादाचा निर्णय उचलून धरत रेल्वेला चपराक लगावली. वसाने यांचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचा दावा करणाऱ्या रेल्वेला त्यासाठी पुरावे सादर करण्यास सांगितले होते. मात्र रेल्वेने ते सादर न केल्याने न्यायालयाने वसाने यांच्या कुटुंबियांची बाजू उचलून धरत नुकसान भरपाईचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर त्यांनी दाव्याचा अर्ज दाखल केल्यापासून त्यांना या नुकसान भरपाईवर सहा टक्के तसेच नुकसान भरपाईची रक्कम जाहीर झाल्यापासूनच्या तारखेपासून सात टक्के व्याज देण्याचेही आदेश न्यायालायने दिले.  वसाने यांच्यावरच त्यांचे कुटुंबिय आíथकदृष्ट्या अवलंबन होते आणि त्यांनी या अपघातामुळे त्यांना गमावले. त्यामुळे ते नुकसान भरपाईसाठ पात्र असल्याचे न्यायालयाने म्हटले.
वसाने ११ जून २००५ रोजी नागपूर-भुसावळ एक्स्प्रेसने मलकापूर येथे जात होते. त्यावेळी तोल जाऊन ते पडले व त्यांचा जीव गेला होता.
मात्र, वसाने यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात आला. गाडी येण्याच्या २० मिनिटे आधी वसाने यांनी फलाटावर येणे अनिवार्य होते. चालत्या गाडीत चढणे हा त्यांचा निष्काळजीपणाच होता त्यामुळे त्यांच्या चुकीमुळे त्यांना जीव गमवावा लागला. त्यासाठी रेल्वेचा काहीही संबंध नाही, असा दावा रेल्वेने केला होता.