महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई ही शासकीय संस्था मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच दरवर्षी प्रतिभावंत बालकांचा राष्ट्रीय स्तरावर बालश्री या पुरस्काराने गौरव करण्याकरिता राज्यस्तरावर विविध कलाक्षेत्रांतील विषयावर आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करते.
या स्पर्धेत बाल विद्यामंदिर हायस्कूल परभणी येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ज्योती केशव लगड हीस बालश्री पुरस्कार २०१२ मिळाला आहे. या स्पर्धेत बालकांमधील सृजनशीलता, संवेदनक्षमता, निर्णयशक्ती, स्वनिर्मिती इत्यादी क्षमता क्षेत्रनिहाय चाचणी करून असामान्य क्षमतेच्या बालकाची राष्ट्रीय बालभवन नवी दिल्लीतर्फे बालश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या पुरस्कारासाठी राज्यातून केवळ पाच विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या कला आविष्कारातून बालकांतील उपजत कलागुण, अभिव्यक्ती, सृजनशीलता यांचे परीक्षण करण्यात येते.
२७ नोव्हेंबर रोजी बालभवन मुंबई येथे ज्योती लगड हिने आपल्या कला अभिव्यक्तीला मुक्त आविष्काराने सृजनशील कला या कलाक्षेत्रात तिन्ही प्रकारांत आपली प्रतिभा प्रकट केली. या परीक्षणातून तिला महाराष्ट्र राज्य बालभवन मुंबईतर्फे राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा बालश्री पुरस्कार देऊन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, अप्पर मुख्य सचिव ज. स. सहारिया तसेच शिक्षण संचालक डॉ. श्रीधर सोळुंके यांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Story img Loader